राज्यात 10 मार्चला पोलिओ लसीकरण 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 मार्च 2019

मुंबई - राज्यात दहा मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार असून, सुमारे एक कोटी 22 लाख बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्यभर 82 हजार 719 पोलिओ बूथ उभारण्यात येणार आहेत. 0 ते 5 वर्षे वयोगटांतील सर्व मुला-मुलींना पोलिओचा डोस द्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. 

दरवर्षी वर्षातून दोन वेळेस पोलिओची विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेसाठी राज्यभर जनजागृती मोहीम हाती घेण्यात यावी, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यंत्रणेला दिले आहे. पोलिओ लसीकरण मोहिमेसंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कृती दलाची आज आढावा बैठक झाली. या वेळी मोहिमेसंदर्भात विविध विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 

गेल्या वर्षी सुमारे एक कोटी 20 लाख 98 हजार बालकांना पोलिओ डोस देऊन 99.7 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. यावर्षी एक कोटी 21 लाख 60 हजार 63 बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दोन लाख 19 हजार 313 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 16 हजार 548 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत दोन कोटी 92 लाख 19 हजार 543 घरांना भेटी देऊन पोलिओ डोस देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. 13 हजार 927 मोबाईल टीम संपूर्ण दिवसभर कार्यरत राहतील. 

पोलिओ लसीकरणाच्या दिवशी लसीकरण केंद्रांवर अखंड वीजपुरवठा राहण्यासाठी ऊर्जा विभागाने आवश्‍यक ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना डॉ. व्यास यांनी या वेळी केली. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समन्वयातून ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. 

अशी असेल व्याप्ती...  
82 हजार 719 
पोलिओ बूथ 

1 कोटी 21 लाख 60 हजार 63 
बालकांना डोसचे उद्दिष्ट 

2 लाख 19 हजार 313 
कर्मचारी 

Web Title: Polio vaccination on March 10 in the state