शिवसेनेसोबतच्या फॉर्म्युल्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

- भाजपला चांगले यश मिळाले

- देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा दूरदृष्टी व पारदर्शी असलेला नेता पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा.

पुणे : भाजपला चांगले यश मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा दूरदृष्टी व पारदर्शी असलेला नेता पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा आहे. भाजपच्या आमदारांची 30 ऑक्‍टोबर रोजी बैठक ठेवली आहे. त्याच्या जेवणाची व्यवस्था, केंद्रीय नेत्यांचे स्वागत ही जबाबदारी माझ्याकडे आहे. शिवसेनेसोबतचा फॉर्म्युला फडणवीस ठरवतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

कोथरूड येथे दिवाळीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपच्या निवडून आलेल्या आमदारांची संसदीय बैठक 30 ऑक्‍टोबर रोजी मुंबईत विधान भवन येथे होणार आहे. या बैठकीला केंद्रीय निरीक्षक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत भाजपचा सभागृहनेता कोण असेल हे ठरेल, असे पाटील यांनी सांगितले.

शिवसेनेशी सुरू असलेल्या वाटाघाटीबद्दल पाटील म्हणाले, शिवसेनेसोबत दोन ते तीन दिवसांत चर्चा सुरू होईल. शिवसेनेने काय मागायचे याचे स्वातंत्र्य त्यांना आहे, पण काय ठरते हे महत्वाचे आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे यावर चर्चा करतील. अडचण आली तर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशीही चर्चा करतील. आमच्याकडे जे काम ज्याला दिले आहे, ते करायचे असते. माझ्याकडे 30 तारखेच्या बैठकीचे निरोप देणे, जेवणाची व्यवस्था करणे, केंद्रीय नेत्यांचे स्वागत करणे हे माझे काम आहे. फॉर्म्युला काय हे देवेंद्र फडणीस ठरवतील.

मुख्यमंत्रिपदाबाबत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे 1960 पासूनचे सर्वात चांगले मुख्यमंत्री आहेत. पाच वर्ष त्यांनी पूर्ण केले, बिगर काँग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेत आले आहे. दूरदृष्टी असलेले व पारदर्शी असलेले फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली चांगला विजय मिळाला आहे.

गेल्यावेळी 260 जागा लढवून 122 जिंकलो, आता 150 लढवून 106 जागा आल्या आहेत. जिंकण्याचा रेट हा 66 टक्के आहे. पण गेल्या वेळेपेक्षा केवळ 10 जागा वाढविणाऱ्याला खूप विजय मिळवला असे दाखवताय हे मला कळाले नाही, असा प्रश्‍नही पाटील यांनी उपस्थित केला.

उदयनराजेंची काळजी केंद्रीय नेते घेतील

साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांचा साताऱ्यात झालेला पराभव आमच्यासाठी धक्कादायक आहे. उदयनराजे हे शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. त्यांच्या गादीला महत्व आहे. भाजपचे केंद्रीय नेते त्यांची काळजी घेतील. तसेच पंकजा मुंडे, राम शिंदे यांचीही पक्ष काळजी घेईल, असे पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Statement of BJP Leader Chandrakant Patil