झेडपीच्या सत्तेसाठी 'खेळ' रंगला

- संजय मिस्कीन
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडीची बोलणी; भाजपला शिवसेनेची गरज

कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडीची बोलणी; भाजपला शिवसेनेची गरज
मुंबई - राज्यभरात सत्ताधारी भाजपच्या विजयाचा गुलाल उधळला जात असतानाच जिल्हा परिषदांमधील सत्ता मिळविण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे सूर जुळले, तर तेरा जिल्हा परिषदांत आघाडीचा झेंडा फडकण्याची शक्‍यता आहे. तर, भाजपला जळगाव, वर्धा, बुलडाणा व लातूरवगळता इतर जिल्हा परिषदांत शिवसेनेशिवाय सत्तेचे समीकरण जुळवणे शक्‍य होणार नसल्याचे चित्र आहे.

कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी वरिष्ठ नेत्यांची चर्चाही झाली असून अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्‍यता आहे. ज्या पक्षाचे उमेदवार अधिक, त्यांचा अध्यक्ष तर मित्रपक्षाचा उपाध्यक्ष या सूत्रावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी चर्चा केली आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे. तर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जिल्हा परिषदांत कॉंग्रेस सोबत आघाडीची बोलणी सुरू करण्याचा निरोप दिला आहे.

कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीवर शिक्‍कामोर्तब झाल्यास सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, अमरावती, गडचिरोली व कोल्हापूरमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी आहे; तर भाजप व शिवसेनेला जळगाव, सांगली, वर्धा, चंद्रपूर, जालना, लातूर, हिंगोली, बुलडाणा, कोल्हापूर, औरंगाबाद, यवतमाळ, हिंगोली व नाशिकमध्ये सत्तेचे समीकरण जुळवणे शक्‍य आहे. शिवसेनेला रायगडमध्ये शेकापसोबत सत्तेची संधी आहे. नाशिक व यवतमाळमध्ये मात्र शिवसेनेला भाजपच्या मदतीशिवाय झेडपीची सत्ता मिळवणे कठीण आहे.

भाजपला यवतमाळ, जालना, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगलीमध्ये शिवसेनेशिवाय सत्ता मिळवणे कठीण आहे. वर्धा, चंद्रपूर, जळगाव, लातूरमध्ये भाजपला बहुमत आहे. मात्र, इतर ठिकाणी शिवसेनेच्या मदतीशिवाय झेडपीची सत्ता अशक्‍य आहे. अशा परिस्थितीत केवळ मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठीच स्पर्धा करत राहिल्यास भाजपला राज्यातील अनेक जिल्हा परिषदांमधील सत्तेपासूनही वंचित राहावे लागेल, अशी अटकळ बांधली जात आहे.

सत्तेची शक्‍यता
13 जिल्हा परिषदांत आघाडीची
12 जिल्हा परिषदांत युतीची

Web Title: politics for zp