
ऑडिओमधील आवाज हा अरुणचा नसल्याचा दावा त्याच्या नातेवाइकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणानंतर अरुणची आई ही सुन्न झाली आहे.
परळी वैजनाथ (जि.बीड) : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आणि त्यानंतर यामध्ये अरुण राठोड याचं नाव समोर आले. मात्र त्याच्या आईने ऑडिओ क्लिपमधील आवाज अरुण नसल्याचे सांगितले. तो असे काही करु शकत नाही. असेही यावेळी आईने सांगितले. अरुण हा चांगला मुलगा होता. आता वीस दिवसांपूर्वी तो पुण्याला गेला होता.
ऑडिओमधील आवाज हा अरुणचा नसल्याचा दावा त्याच्या नातेवाइकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणानंतर अरुणची आई ही सुन्न झाली आहे. अरुणने अस काही केलेच नाही असं म्हणत त्याच्या आईला अश्रु अनावर झाले. मागील काही दिवसांपासून अरुण राठोड याची या सर्व प्रकरणांमध्ये काय भूमिका आहे याबद्दल मोठे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अरुणच्या घरी चोरी
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या ऑडिओ क्लिपमध्ये संवाद साधणारा अरुण राठोड याच्या घरी सोमवारी (ता.१५) पहाटे चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरी झाली की, जाणीवपूर्वक कोणी हा प्रकार केला याचा तपास ग्रामीण पोलीस करत आहेत. येथील ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. रविवारी (ता.१४) या प्रकरणातील संशयित अरुण राठोड व त्याचे कुटुंबीय घराला कुलूप लावून गेले होते.
सोमवारी सकाळी परत अरुण राठोड यांचे कुटुंबीय घरी आले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या चोरीत नेमके काय चोरून नेले याची माहिती समोर आलेली नाही. मात्र या प्रकरणात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. पाहणी करत आहेत. सबंध राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. अरुण राठोड यांच्या घरी नेमकी आताच का चोरी झाली? याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. चोरी झाली की, कोणी जाणीवपूर्वक केली याचा तपास देखील आता ग्रामीण पोलिसांना करावा लागणार आहे.
संपादन - गणेश पिटेकर