पूजा चव्हाण हिच्या वडीलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, पूजा माझी मुलगी नव्हती, तो मुलगा होता!

प्रवीण फुटके
Sunday, 14 February 2021

मोठ्या नेत्याचे नाव या प्रकरणात आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले.

परळी वैजनाथ(जि.बीड) : परळी येथील बंजारा समाजाची युवती पूजा चव्हाण हिने पुण्यात आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर मीडियात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मुलीच्या मृत्यूनंतर आई, वडिलांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. रविवारी (ता.१४) दिलेल्या प्रतिक्रियेत माझा कोणावरही संशय नाही, असे मत व्यक्त केले आहे. तर आजोबांनी शासनाने आपल्या यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. पुजा चव्हाण हिने पुण्यात आत्महत्या केल्यानंतर माध्यमांमध्ये विदर्भातील बंजारा समाजाचे तथा शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना पुजाच्या मृत्यू प्रकरणी विरोधी पक्षाकडून जबाबदार धरण्यात आले.

मोठ्या नेत्याचे नाव या प्रकरणात आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. पण आणखीनही पुजाच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी माध्यमांजवळ मनमोकळे करताना सांगितले, की पूजा माझी मुलगी नव्हती तर तो मुलगा होता. ती अत्यंत धाडसी होती. पूजाच्या नावावर पोल्ट्रीफार्म सुरू करण्यासाठी बँकेकडून कर्ज काढले आहे. पण गेल्या दोन वर्षांपासून हा व्यवसाय पूर्ण तोट्यात आहे. याचा ताण पुजाला येत होती.

तसेच पूजा सतत आजारी असायची याचाही ताण तिला येत होता. मी तिला तू ताण घेऊ नको सर्व काही व्यवस्थित होईल. पण पुण्यात जाऊन तिने बहुतेक याच कारणामुळे आत्महत्या केली आहे, असे वाटते. दुसरे कोणतेही कारण नाही. फक्त माध्यमांनी आमची बदनामी थांबवावी असे आवाहन लहू चव्हाण यांनी केले आहे. चौकशीमधून काय पुढे यायचे ते येईल. आमचा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे. आमचा समाज आमच्या पाठीशी आहे. असे यावेळी बोलताना लहू चव्हाण यांनी सांगितले. तर पुजाचे आजोबा यांनी बोलताना सांगितले की, पुजा २०-२५ दिवसांपूर्वी येवून भेटून गेली तिच्या मृत्यूची चौकशी शासकीय यंत्रणेमार्फत करावी अशी मागणी केली आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pooja Chavan Suicide Case Father Said Pooj Was My Son Parli Beed Crime News