
हा रस्ता झाल्यास औरंगाबाद ते पुणे प्रवास सुकर होईल. प्रामुख्याने वेळ वाचेल. शिवाय वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सुटणार आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद ते पुणे रहदारी करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत असतात. प्रामुख्याने नगरच्या पुढे गेल्यानंतर वाहतूक जाम आणि अपघातांचेही प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे धुळे-सोलापूरप्रमाणे औरंगाबाद ते पुणे थेट रस्ता पाहिजे, अशी मागणी औरंगाबाद फर्स्टतर्फे खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे यांच्यामार्फत बुधवारी (ता. तीन फेब्रुवारी) नवी दिल्ली येथे करण्यात आली होती. यावेळी प्रीतिश चॅटर्जी यांची उपस्थिती होती. औरंगाबाद ते पुणे थेट ॲक्सेस रस्त्याचे काम येत्या सहा महिन्यांत सुरू होईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
याबाबत श्री.चॅटर्जी म्हणाले की, औरंगाबाद ते पुणे थेट रस्ता असावा ही औरंगाबादकरांची मागणी होती. त्यासाठी औरंगाबाद फर्स्टसह व्यक्ती आणि संस्थांनीही पुढाकार घेतला होता. हा रस्ता झाल्यास औरंगाबाद ते पुणे प्रवास सुकर होईल. प्रामुख्याने वेळ वाचेल. शिवाय वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सुटणार आहे. त्याशिवाय पुणे, मुंबई, नगर आणि नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यासही मोठी मदत होईल. याबद्दल औरंगाबाद फर्स्टतर्फे अध्यक्ष प्रीतिश चॅटर्जी, सचिव रणजीत कक्कड आणि कोषाध्यक्ष अनिल माळी यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी आनंद व्यक्त केला.
दहा दिवसांत घेतला निर्णय
तीन फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे औरंगाबाद फर्स्टतर्फे खासदार भागवत कराड आणि आमदार अतुल सावे यांच्या उपस्थितीत मागणी केली होती. त्यानंतर या मार्गावरील वास्तविक रहदारी किती आणि वाहतुकीचे नियोजन कसे आहे, याची माहिती त्यांनी घेतली. अवघ्या आठवडाभरात यासंदर्भात अभ्यास करून केंद्रीय मंत्र्यांनी या रस्त्याची घोषणा करून सहा महिन्यांत थेट काम सुरू करण्याचा शब्दही दिला.
संपादन - गणेश पिटेकर