
श्रीकृष्ण आयोगानं आपल्या अहवालात 'धिस इज द एक्सापम्पल ऑफ स्टेटसमनशीप' अशा शब्दात त्यांची वाखाणणीही केली.
12 मार्च 1993 रोजी मुंबई साखळी बॉम्बस्फोटाने हादरली होती. तब्बल 12 बॉम्बस्फोट मुंबईच्या विविध भागात झाले होते. हे बॉम्ब स्कूटरमध्ये, कारमध्ये, हॉटेलमध्ये तसेच सुटकेसमध्ये इत्यादी जागी ठेवण्यात आले होते. या बॉम्बस्फोटांमध्ये तब्बल 250 लोकांचा मृत्यू झाला होता तर 700 निष्पाप लोक हकनाक मारले गेले होते. काही बातम्यांनुसार तर जवळपास 300 हून अधिक लोक मारले गेले होते. तर जखमींचा आकडा हा 1,400 च्यावर होता, असं म्हणतात.
या बॉम्बस्फोटांच्या आदल्या दिवशीच तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पोलिस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत म्हटलं होतं की, मला मुंबई म्हणजे बेरूतची प्रतिकृती बनलेली नकोय. मात्र, दुर्दैव असं की त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईवर अत्यंत नृशंस असा दहशतवादी हल्ला झाला. रात्री उशीरा अंतिम आकडा समजला तेव्हा 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळाली होती. शरद पवार यांनी तातडीने सगळी माहिती घेतली. त्यानंतर शरद पवारांनी जाहीर केलं की एकूण 13 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले आहेत. मात्र, वास्तव असे होते की 12 जागीच बॉम्बस्फोट झाले होते. मग तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार खोटं का बोललं होते? याचा खुलासा त्यांनी आपलं आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती'मध्ये केला आहे.
हेही वाचा - अंगणवाडी महिलांसंदर्भातील 'ती' बातमी शरद पवारांनी का दाबली माहितेय का?
याबाबत शरद पवार लिहतात, 12 मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेवून सहाच दिवस झाले असताना मुख्यमंत्री कार्यालयात मी कामकाजात गर्क होतो. बाराच्या सुमारास अचानक मोठा आवाज आला. मी खिडकीपाशी धावलो, पाहतो तर एअर इंडियाच्या इमारतीतून लोक सैरावैरा पळताना दिसत होते. तो आवाज बॉम्बस्फोटाचाच आहे याची मला खात्री झाली. थोड्याच वेळात समजलं, की शिवसेना भवन, शेअर बाजार, सेंच्युरी बाजार, एअर इंडिया बिल्डिंग, हॉटेल जुहू सेंटार, झवेरी बाझार, प्लाझा सिनेमा, पासपोर्ट ऑफिस वरळी, काथा बझार वरळी, हॉटेल सी रॉक, सहारा विमानतळ (आत्ताचे छत्रपती शिवाजी आंतराष्ट्रीय विमानतळ) या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले आहेत. ही सारी ठिकाणं हिंदूबहूल होती. हिंदू समाजानं पेटून मुंबईत आणखी रंणकंदन व्हावं असा डाव स्फोटामागे असावा हे मी ताडलं. एअर इंडियाच्या इमारतीतल्या स्फोटकांच मी बारकाईने निरिक्षण केलं. संरक्षण मंत्रालयात काम केलेलं असल्यामुळे ती साधी स्फोटकं नव्हती, हे ही माझ्या लक्षात आलं. संरक्षण मंत्रालयात डॉक्टर अब्दुल कलाम माझे सल्लागार होते. त्यांना मी फोन केला आणि स्फोटकांच वर्णन केलं. त्यांच्याशी बोलल्यावर त्यांनी ही स्फोटासाठी RDX चाच वापर झाल्याच्या माझ्या शंकेला दुजोरा दिला. त्यावेळी कोणत्याही स्थितीत मुंबईत पुन्हा जातीय दंगली भडकणार नाहीत एवढी खबरदारी माझ्या दृष्टीने अग्रक्रमाची होती. त्याक्षणी तातडीनं दूरदर्शनवरून आणि आकाशवाणी वरूनही जनतेला घटनेची माहिती दिली. ही माहिती देत असताना जाणिवपुर्वक बॉम्बस्फोट 12 ठिकाणी झाले असूनही 13 ठिकाणी झाल्याचं जाणिवपुर्वक नमुद केलं. सर्व बॉम्बस्फोट हिंदू बहूल भागात झालेले होते. परंतु कोणतिही जातीय अनुचित प्रतिक्रिया उमटू नये म्हणून मी मस्जिद बंदर या मुस्लीम भागातही स्फोट झाल्याचं सांगितलं.
हेही वाचा - शरदचंद्र पवार : अद्भूत किमया करण्याची रुबाबी कसरत करणारा लोकनेता
थोडक्यात, ही घटना एका धर्मान दूसऱ्या धर्माविरुद्ध केलेलं कारस्थान नसून भारताच्या विरोधात घडवून आणलेला कट आहे, असं सांगत परिस्थिती चिघळणार नाही आणि नियंत्रणात राहिल याची काळजी शरद पवारांनी मुख्यमंत्री म्हणून घेतली. मुंबई दंगलीच्या चौकशीसाठी श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आला होता. या आयोगापुढे त्यांनाही पाचारण करण्यात आलं. बाराऐवजी तेरा बॉम्बस्फोट झाल्याच्या त्यांच्या विधानासंदर्भात स्पष्टीकरण मागण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं. स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितलं, माझं विधान असत्य होतं. पण पुढील संभाव्य हिंसा रोखण्यासाठी शहाणपणानं जाणिवपुर्वक घेतलेला तो निर्णय होता. श्रीकृष्ण आयोगान त्यांच्या या प्रसंगावधानाची विशेष दखल घेतली. या आयोगानं आपल्या अहवालात 'धिस इज द एक्सापम्पल ऑफ स्टेटसमनशीप' अशा शब्दात त्याची वाखाणणीही केली.
हेही वाचा - महाराष्ट्राचे तरुण मुख्यमंत्री ते देशाचे कृषीमंत्री; वाचा शरद पवारांची राजकीय कारकीर्द
26/11 च्या अमानुष हल्ल्याप्रमाणेच 1993 चा मुंबई हल्ला देखील एक महत्त्वाचा आणि नियोजनबद्ध घडवून आणलेला भ्याड दहशतवादी हल्ला समजला जातो. या हल्ल्यामध्ये, भारताच्या मातीमध्ये पहिल्यांदाच RDX स्फोटकांचा स्फोट झाला होता. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या संख्येवरून हा भारतावर झालेला त्यावेळचा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला होता.