प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संरक्षण सल्लागार समितीमधून हकालपट्टी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

बुधवारी भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे यांना देशभक्त ठरवले. यावरून लोकसभेत गदारोळ उडाला होता. आज प्रज्ञा सिंह ठाकूरना संरक्षण मंत्रालयाच्या समितीच्या सल्लागार पदावरून काढून टाकल्याची घोषणा भाजपाने केली आहे.

"मुंबई : बुधवारी संसदेत जोरदार वादळ झाले. या वादळास कारणीभूत ठरल्या त्या भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर. त्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडल्याची टीका सर्वच स्तरातून होत आहे. 

लोकसभेत एसपीजी (SPG) संशोधन बिलावर चर्चा सुरु होती. यावर डीएमकेचे खासदार ए. राजा यांनी आपले मत मांडले. यावेळी नथुराम गोडसेच्या एका विधानाचा संदर्भ देत होते. यावेळी भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी त्यांना थांबवत तुम्ही एका देशभक्ताचे उदाहण कसे काय देऊ शकता, असा सवाल केला होता. यावरून लोकसभेत गदारोळ उडाला होता. आज प्रज्ञा सिंह ठाकूरना संरक्षण मंत्रालयाच्या समितीच्या सल्लागार पदावरून काढून टाकल्याची घोषणा भाजपाने केली आहे.

दरम्यान, प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे विधान लोकसभेच्या कार्यवाहीतून हटविण्यात आले आहे. तसेच, भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, या प्रकाराबद्दल भाजपा प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर कारवाई करेल. यानुसार भाजपाने कारवाई केली आहे. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना या समितीवरून हटविण्यात येत असल्य़ाचे म्हटले आहे. त्यांनी काल लोकसभेत केलेले वक्तव्य निंदनिय आहे. भाजपा कधीही अशा विचारांना थारा देणार नाही तसेच अशा वक्तव्यांचे समर्थनही करणार नाही. आम्ही संरक्षण सल्लागार समितीवरून तिला काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या अधिवेशनात पक्षाच्या कोणत्याही बैठकीला तिला बोलविण्यात येणार नसल्याचे नड्डा यांनी सांगितले.

दरम्यान, प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी याआधीही नथुराम गोडसे हा देशभक्त असल्याचे विधान केले होते. त्यावेळी दक्षिणेतील अभिनेते कमल हसन यांनी नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता, असा दावा केला होता. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील, असे विधान केले होते. त्यानंतर वादास तोंड फुटले होते. मात्र भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यापासून अंतर राखताना त्यांना माफी मागण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आपल्या विधानाबाबत माफी मागितली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pragya singh thakur removed defense advisory committee after nathuram godse statement