उद्धवअस्त्राने मुख्यमंत्री घायाळ 

प्रकाश पाटील 
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

कमळाच्या पाकळ्या डोळ्यावर बांधून जे मोदीभक्त शिवसेनेला विरोध करीत आहे तो अंध आहे. मोदीभक्तांनी उघड्या डोळ्यांनी शिवसेनेचा इतिहास तपासावा. ज्यावेळी यांच्यात लढण्याचे बळ नव्हते तेव्हा हीच मंडळी बाळासाहेबांचा जयघोष करीत होती.

शिवसेनेने जर का एकदा ठरविले की तुटून पडायचे तर मग ती मागेपुढे पाहत नाही. त्यांना फक्त लढणे हेच माहीत असते. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेने बाजी मारली आहे. उद्ववअस्त्रामुळे मुख्यमंत्रीही घायाळ झाल्याचे दिसून येते. 

महाराष्ट्रात युती तुटेल किंवा नाही हे आज सांगता येत नाही. सध्या प्रचाराचा फिव्हर आहे. सर्वच पक्षाचा तोफा धडधडू लागल्यात. पण, दोन तोफांचीच सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. यावेळी प्रचारात सर्वांत कोणी आघाडी घेतली असेल तर ती उद्धव ठाकरे यांनी. त्यांनी शक्तिमान भाजपला आणि फडणवीसांना असा काही पंच दिला आहे, की ते पार घायाळ झालेत. 

भाजपच्या ठोश्‍याला ठोसा देण्याची एकही संधी त्यांनी सोडलेली दिसत नाही. त्यांनी जे थेट प्रहार केले आहेत त्यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदीही सुटले नाहीत. बुळचट कॉंग्रेसवाल्यांना जे जमले नाही ते उद्धव यांनी करून दाखविले असे म्हणावे लागेल. मानावे लागेल. राज्याचे प्रमुख असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाला वलय आहे. ते जर सोमैया किंवा शेलार प्रमाणे असते तर ते उद्धव यांच्याशी लढूही शकले नसते. शिवसेनेने भाजपला जे खुले आव्हान दिले त्याचा सर्वाधिक आनंद अर्थात कॉंग्रेसवाल्यांना झाला असावा. 

शिवसेना असा पक्ष आहे, की त्याने भल्याभल्यांना लोळवले आहे. ज्या भुजबळांनी शिवसेना संपविण्याची भाषा केली ते आज कुठे आहेत. हेच भुजबळ शिवसेनेच्या हल्लेखोरांना माफ करतात. त्यांना आज काहीही आठवत नाही. शिवसेना आक्रमक प्रचारात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपला कधीच ऐकणार नाही. आक्रमकता हा शिवसेनेचा स्थायीभाव आहे. या आक्रमकतेसमोर आजपर्यंत भलेभले घायाळ झालेत. अनेक नेते आणि पत्रकार विरोध करून म्हातारे झाले. ते म्हातारे झाले पण शिवसेना दिवसेंदिवस तरुणच होत गेली हे वास्तव आहे. ज्येष्ठ नेते नारायण राणे, गणेश नाईक आदी नेत्यांना वेळोवेळी लोळवले आहे. 

निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या शिवसेनेने सुरवातीपासून आपले लक्ष्य भाजपच ठेवले. गेल्या काही दिवसातील त्यांची भाषणे जर काळजीपूर्वक ऐकली तर असे लक्षात येईल की ते कॉंग्रेस आणि इतर पक्षावर टीका करताना दिसत नाही. त्यांनी ठरविले आहे की भाजपलाच शिंगावर घ्यायचे. ते त्यांनी करून दाखविले. शिवसेना परिणामाला कदापी घाबरत नाही हे भाजपच्या नीट लक्षात येत नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्याने ते फक्त सर्वांनाच चौकशीची आणि फाइल बाहेर काढण्याची धमकी देताहेत. खरेतर हा मुद्दा निवडणुकीपुरता बाजूला ठेवून पक्षाचा एक नेता म्हणून "इट का जवाब फतरेसे द्यायला' हवा होता. त्यांचा भाषण करण्याचा एकूणच टोन पाहिला तर ते लोकांना अपील होतो आहे असे दिसत नाही. 

उद्धवांच्या केवळ भाषणबाजीने भाजपला चारीमुंड्याचित केले नाही तर शिवसेनेचे कार्यकर्ते सोशल मीडिया आणि जाहीरातबाजीत जो नेमकेपणा साधतात. जी टर उडवतात ते इतर कुठल्याच पक्षाला जमत नाही. वातावरण निर्मिती करावी ती शिवसेनेनेच. लढावे शिवसेनेने, झगडावे शिवसेनेने. मदतीला धावून जावे शिवसेनेने. शिवसेना नेहमीच मराठी माणसासाठी लढली. त्याला न्यायहक्क मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरली. सुधीर जोशींसारख्या माणसाने मराठी माणसासाठी खूप मोठे कार्य केले. तसेच शिवसेनेच्या सर्वच कामगार संघटना मराठी माणसासाठी झगडत राहिल्या.हे सत्य आहे. आज घरात बसून मुंबईचा इतिहास सांगणाऱ्या बोरूबहाद्ददरांना मुंबईत शिवसेना का हवी ? हे कळत नाही.

कमळाच्या पाकळ्या डोळ्यावर बांधून जे मोदीभक्त शिवसेनेला विरोध करीत आहे तो अंध आहे. मोदीभक्तांनी उघड्या डोळ्यांनी शिवसेनेचा इतिहास तपासावा. ज्यावेळी यांच्यात लढण्याचे बळ नव्हते तेव्हा हीच मंडळी बाळासाहेबांचा जयघोष करीत होती. बाळासाहेबांनंतर ते आता शिवसेनेला संपवायला निघाले. पण, कावळ्याच्या आर्शिवादाने फांदी तुटणार नाही. शिवसेनेचा जय होऊ द्या किंवा पराजय. आजही मुंबईत शिवसेना हवी ही प्रत्येक मराठी माणसाची भावना आहे.

Web Title: Prakash Patil writes about shiv sena, bjp controversy