बकऱ्याला पाणी पाजले जात आहे? 

प्रकाश पाटील 
सोमवार, 27 मार्च 2017

शिवसेनेने एकदा तरी भाजपला दोन गोष्टी ठणकावून सांगितल्या पाहिजेत असे शिवसेनेतील मंडळींना वाटू लागले आहे. शिवसेना-भाजपची मैत्री पंचवीस वर्षाहून अधिकची जुनी. ती टिकली पाहिजे हे खरे. पण ती कशी टिकणार आणि कोण टिकविणार? दोन्ही पक्षातील दुवा आता कोण? याविषयी एखादे नावही घेता येत नाही.

भाजपचा एक नेता शिवसेनेला गोंजारतो, तर दुसरा इशारा देतो यावरून काय समजायचे. युतीचे हे नाटक आणखी किती दिवस चालणार. बकऱ्याला कापण्यापूर्वी त्याला पाणी पाजण्याचे काम सुरू आहे? 

ग्रामीण भागात वरील म्हण प्रसिद्ध आहे. गावात बकरा कापायचा आणि मटनाचा बेत जेव्हा होतो तेव्हा थोडी वर्गणी काढली जाते. बकरा कापला की ज्याचा त्याचा वाटा दिला जातो. पण, बकरा कापायच्या आधी त्याला पाणी पाजले जाते. त्याच्या घशाला कोरड पडू नये. त्याची इच्छा मागे राहू नये असा समज आहे. सध्या राजकारणात शिवसेनेचा बळी घेण्यासाठी परममित्र भाजप टपला आहे. शिवसेनेचा उपद्रव इतका वाढला आहे की तो सहन करण्यापलीकडे गेला आहे. असे या पक्षाच्या नेत्यांचे मत बनले आहे. म्हणूनच तर शिवसेनेविषयी वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळी विधाने केली जात आहे. 

एकीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जाहीरपणे सांगत आहेत की "तोडायचे तोडा, एकदा निर्णय घ्या ' तर दुसरीकडे सत्ता टिकविण्यासाठी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पंतप्रधान निमंत्रण देतात. "डिनर डिप्लोमसी'मध्ये काय होईल हे सांगता येत नाही. उद्धव "पीएम' यांच्यासोबत डिनर घेतात की नाही? ते दिल्लीला जाणार की नाही? हे लवकरच स्पष्ट होईल. पण, शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी उद्धव हे डिनर डिप्लोमसीला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते ज्या अर्थी असे सांगण्याचे धाडस करतात तेव्हा त्यांची उद्धव यांच्याशी चर्चा झालीच असणार असे समजण्यास काही हरकत नसावी. राऊत जे सांगत आहेत तसा ठाकरी बाणा त्यांनी दाखविला तर शिवसेनेचा खमकेपणा दिसून येईल.

शिवसेनेने एकदा तरी भाजपला दोन गोष्टी ठणकावून सांगितल्या पाहिजेत असे शिवसेनेतील मंडळींना वाटू लागले आहे. शिवसेना-भाजपची मैत्री पंचवीस वर्षाहून अधिकची जुनी. ती टिकली पाहिजे हे खरे. पण ती कशी टिकणार आणि कोण टिकविणार? दोन्ही पक्षातील दुवा आता कोण? याविषयी एखादे नावही घेता येत नाही. पंचवीस वर्षातील अनेकवर्षे हातात हात घालून लढलेल्या या दोन पक्षात मतभेद असूनही मैत्री टिकली. जुने जानते नेते दोन्ही पक्षात होते. आता तसे चित्र दिसत नाही. 

शिवसेना-भाजपचे संबंध कधी नव्हे इतके ताणले गेले आहेत ते दोघेही मनाने आता खूप जवळ येतील असे चित्र नाही. गेल्या दोन-अडीच वर्षातील विचार केला तर शिवसेनेला सर्वाधिक अडचणीत आणण्याचे काम भाजपने केले. वेळ मिळेल तेव्हा शिवसेनेला चेपण्याचे काम करण्यात आले. मात्र, शिवसेनेनेही भाजपला काही भीक घातली नाही. उद्धव यांच्यातील "ठाकरे' जेव्हा जागा होतो तेव्हा तेही भाजपला त्यांची जागा दाखवून देतात. 

कुठे युती तोडण्याची भाषा तर कधी अपमानास्पद वागणूक. कधी दुर्लक्ष. सत्तेत असूनही मानाचे पान नाही. कुरघोडीचे राजकारण दररोज केले जात असल्याची भावना शिवसेना कार्यकर्त्यांत आहे. भाजपने गेल्या दोन अडीच वर्षात काँग्रेस किंवा राष्ट्रवादी विरोधात जितके राजकारण केले नाही तितके राजकारण शिवसेनेविषयी केले. शिवसेनेला जितके अडचणीत आणता येईल तितके आणले. आता तर थेट फोडाफोडीची भाषा करून पिल्लू सोडले जात आहे. अशाने शिवसेना संपेल असे जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. शिवसेनेचा इतिहास असा सांगतो की जे जे शिवसेनेतून फुटले ते पुन्हा निवडून आले नाहीत किंवा राजकीय दृष्ट्या संपले. नारायण राणे आज शिवसेनेविरोधात कितीही गरळ ओकत असले तरी त्यांनी एक गोष्ट मान्य करायला हवी की फक्त शिवसेनेनेच आपल्याला वेळोवेळी लोळविले आहे. हे सत्य ने नाकारणार नाहीत. मग, ते भाजपत गेले काय किंवा अन्य पक्षात मात्र भूतकाळात जे घडून गेले ते सत्य होते.

कोणताही पक्ष लगेच संपत नाही. पक्ष उभारण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. हे यापूर्वीच्या ब्लॉगमध्ये मी स्पष्ट केले होते. शिवसेनेविषयी मतभेद असू शकतात. पण, शिवसेनेला नेस्तनाबूत करणे म्हणावे तितके सोपे नाही. जर भाजप शिवसेनेच्या हात धुवून मागे लागला असेल, तर पक्षप्रमुखांनी एकदा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. आमच्या मुळावर उठला असाल तर आम्ही नाही तुमच्यासोबत एका ताटात जेवणार हे ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आक्रमक झाल्याने भाजप थोडा धास्तावला आहे. त्यामुळे आता त्यांना अडचणीच्या काळात जुन्या मित्राची आठवण येत आहे. मित्राला अडचणीच्या काळात मदत करायची सोडून त्याला वाऱ्यावर सोडणारा मित्र तो "परम' कसा असू शकतो. मित्र नव्हे तो शत्रूच म्हटला पाहिजे.

भाजपचा एक नेता शिवसेनेला गोंजारतो तर दुसरा इशारा देतो यावरून काय समजायचे. युतीचे हे नाटक आणखी किती दिवस चालणार. बकऱ्याला कापण्यापूर्वी त्याला पाणी पाजण्याचे काम सुरू आहे हे मात्र नक्की !

Web Title: Prakash Patil writes about Shiv Sena, BJP dispute