जानकरसाहेब, माऊलींचा विश्‍वास सार्थकी लावा !

प्रकाश पाटील
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

खरंतर आज (15 डिसेंबर) मंत्री महादेव जानकरांच्या वडिलांचा स्मृतिदिन. अठराविश्‍व दारिद्य्र असलेल्या एका अशिक्षित आणि मेंढंर राखणाऱ्या धनगर समाजातील घरात जन्मलेल्या या पोरानं स्वकर्तृत्वावर उंच भरारी घेतली. ते जेव्हा मंत्री झाले तेव्हा त्यांच्या वयोवृद्ध माऊलीने असे म्हटले होते, की महादेव ज्या दिवशी चुकेल त्यादिवशी मी त्याचे कान धरीन. पण, तो गरिबांचे भलं करेल. यावर माझा विश्‍वास आहे. हा विश्वास या माऊलीच्या पोरानं खरा करून दाखवावा हीच अपेक्षा.

महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन कशासाठी असते. तेथे आमदारांकडून कोणत्या अपेक्षा ठेवल्या जातात. आपआपल्या मतदारसंघातील किंवा राज्यातील गंभीर प्रश्‍न आहेत तेथे चर्चा व्हावी. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांचे म्हणणे एकूण घेतानाच त्यातून मार्ग काढावा. निर्णय व्हावा. जनतेचे हित लक्षात घ्यावे असा सर्वसाधारणपणे त्यामागे हेतू असतो. परंतु गेल्या काही वर्षापासून तसे होताना दिसत नाही. विधिमंडळात जो अधिक आरडाओरड करेल. जो अधिक कागद भिरकावेल. असंसदीय शब्द वापरेल त्यालाच अधिक प्रसिद्ध मिळते आणि तोच हिरो ठरतो.
आज जे सुपात आहेत ते उद्या जात्यात असूही शकतात. सत्ता ही कोणासाठी परमनन्ट नसते. मात्र एखादा मुद्दा किती ताणायचा याचा कोठे तरी विचार व्हायला हवा. निवडणूक अधिकाऱ्याला फोन केल्याप्रकरणी पशू संवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्यासाठी विधिमंडळाचे किती तास खर्ची पडले आणि किती पैसे वाया गेले याचा हिशोब कोणीच मांडताना दिसत नाही. अर्थात विरोधी बाकावर असताना आजचे सत्ताधारी शिवसेना व भाजपची मंडळीही तेच करीत होते, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. आत्मपरीक्षण तर दोघांनी करायला हवे. पण, हे लक्षात घेणार
कोण ?

जानकर प्रकरणावरून मीडियानेही इतका वेळ खर्ची घातला की जणू त्यांनी राजीनामा दिला नाही तर राज्यावर खूप मोठे संकट कोसळणार आहे. तसेच विरोधकांनीही इतका गोंधळ घालूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांची पाठराखण केलीच. जानकर हे सरळ आणि सज्जन असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ ते त्यांचा राजीनामा घेणार नाहीत हे स्पष्ट होते.विधिमंडळात राजीनाम्याची मागणी करून जर सरकार ऐकत नसेल तर जनतेच्या दरबारात जाण्याची संधी विरोधकांनाही आहे ना ? परंतु तसे होत नाही. विधिमंडळात गोंधळ घालून जनतेचे लक्ष वेधण्यासाठी इतका आटापिटा का म्हणून सुरू आहे.

दैनिक सकाळने गेल्या अधिवेशनात विधिमंडळाचा किती वेळ वाया गेला याचे दररोजचे तास राज्यातील जनतेसमोर मांडले होते. यामागे हेतू हा होता की जनतेचे प्रश्‍न विधिमंडळात मांडले जावेत. एकवेळ आपण असा विचार करू की, हो ! जानकर चुकले आहेत. त्यांच्या हातून चूक झाली आहे. जर त्यांनी माफी मागितली असेल तर त्यांना माफही करायला हवे. जानकर हे प्रथमच मंत्री झाले आहेत. आमदार म्हणूनही त्यांची ही सुरवात आहे. म्हणजेच ते कसलेले किंवा कावेबाज राजकारणी आहेत असे समजण्याचे कारण नाही. मंत्री म्हणून जी जबाबदारी असते ती पार पाडताना कोणती काळजी घेतली पाहिजे याचे भानही त्यांना राहिले नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आमदारांसारखे ते तावूनसुलाखून निघालेले नेते नाहीत. हे विरोधक लक्षात घेत नाहीत.

ज्या माणसाने आयुष्यातील 25 वर्षाहून अधिक काळ ज्या भटक्‍या माणसांसाठी घालविली. जी माणसं मेंढरांच्या मागे हिंडत होती. त्या माणसांच्या मागे हा माणूस ढाल म्हणून उभा राहिला. त्यांच्या विकासाचे स्वप्न तो पाहत आला. या समाजातील पोराबाळांनी केवळ मेंढरं न बनता मुख्य प्रवाहात यावे यासाठी स्वत:चंदनाप्रमाणे झिजत राहिला. तहानभूक विसरून जेथे तुकडाभाकरी मिळेल तेथे तो खात राहिला. प्रसंगी एसटी स्टॅन्डवर झोपला. त्या माणसानं समाजातील माणसानां चांगले दिवस येत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही आणि स्वत:च्या घरी जाणार नाही अशी शपथ घेतली आणि तसेच करून दाखविले. अपवाद फक्त वडिलांच्या निधनाचा असेल. इतके समर्पित जीवन जगणाऱ्या या माणसाला ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी ओळखलं. त्याला आधार दिला. तू मोठा हो तर समाज मोठा होईल. याची जाणीव करून दिली. महादेव नावाच्या धनगराच्या पोराला जवळ घेतलं. दुर्दैवाने मुंडे यांचे निधन झाले. पुढे त्यांच्या लेकीनेही त्यांना साथ दिली. हे विसरून चालणार नाही. आघाडीच्या काळातही असे अनेक कलंकित मंत्री होतेच की त्यांचा तरी कुठे राजीनामा घेतला होता. विरोधकांनी राज्यापुढे अनेक गंभीर प्रश्‍न आहेत याची जाणीव ठेवायला हवी.

येथे दुसरी एक गोष्ट महत्त्वाची वाटते, की सत्ताधारी आणि विरोधकांमधील जे ज्येष्ठ सदस्य आहेत अशांनी एकत्र बसून एखाद्या मुद्यावर मार्ग काढला पाहिजे. मात्र तेही होताना दिसत नाही. जानकरप्रकरणावरून या अधिवेशनाचे सूप वाजणार आणि जनतेच्या प्रश्‍नाचेही तीनतेरा वाजणार हे जवळजवळ स्पष्ट होत आहे. तरीही जानकर यांनीही एकदा जीभ पोळल्यानंतर ताकही फुंकून पिण्याची गरज असताना, एकदा ठेच लागली असताना पुन्हा पुन्हा चुका करणे योग्य नाही. आपण मंत्री आहोत याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी. जो समाज तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहतो आहे. त्या समाजाचे भले करण्यासाठी जानकरांसारखा एक मंत्री मंत्रिमंडळात असायलाच हवा ही सार्वत्रिक भावना असताना शुल्लक गोष्टीवरून वाद स्वत:वर का ओढवून घेतले जात आहेत हेच कळत नाही. एक जानकर घडायला तीन दशक खर्ची पडली. आता दुसरा जानकर निर्माण करायला तितकीच वर्षे खर्ची घातली तरी असा माणूस पुन्हा घडू शकत नाही. रानोमाळ, दऱ्याडोंगरातील काटेकुटे हेच ज्यांचे आयुष्य बनले अशा भोळ्याभाबड्या आणि अशिक्षित जनतेकडे जानकरांसारख्या सुज्ञ माणसाने अंतःकरणापासून पाहण्याची आजही गरज आहे. ते उच्चशिक्षित आहेत. ज्यांना सामाजिक जाण उत्तम आहे. जे मनमोकळे आहेत. जे कोणाला घाबरत नाहीत.जे कोणाची भिडभाड ठेवत नाहीत ते म्हणजे जानकर. पण, राजकारणात हे चालत नाही. प्रत्येक पाऊल अतिशय काळजीपूर्वक टाकावे लागते. हे त्यांनी खरेतर लक्षात घ्यायला हवे. सार्वजनिक जीवनात मित्र कमी आणि शत्रू अधिक असतात. आपले शत्रू कोण आणि मित्र कोण हे त्यांनी ओळखले पाहिजे. शहाण्यास अधिक सांगणे योग्य नाही. राज्याच्या राजकारणाची नस या माणसाला माहीत आहे. एक चूक एकदा नव्हे दोन तीनदा माफ करता येते. पण वारंवार त्याच चुका करीत राहिल्यास शेवटी कोणी माफ करणार नाही हे ही त्यांनी लक्षात घ्यावे.

निवडणूक अधिकाऱ्याला फोन करणे ही जाणकरांची चूकच होती. पण, त्यांनी कोणताही भ्रष्टाचार किंवा तिजोरी तुटलेली नाही. त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप नाही. खून केला नाही की दरोडा घातला नाही. पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर एक चूक केली हे मान्य करून त्यांना माफ करायला हवे असे वाटते. गावखेड्यातून आलेली माणसं ही भोळीभाबडी असतात.या माणसाचा तोंडवळा शहरी नसतो "ओठात एक, पोटात ऐक' असले काही जमत नाही. म्हणून ती चुकतात आणि अडचणीत येतात.

खरंतर आज (15 डिसेंबर) महादेव जानकरांचे वडील जगन्नाथ मारुती जानकर यांचा स्मृतिदिन. एका अशिक्षित आणि मेंढंर राखणाऱ्या घरात जन्मलेल्या या पोरानं स्वकर्तृत्वावर इतकी मोठी झेप घेतली हेच आश्‍चर्य. ते जेव्हा मंत्री झाले तेव्हा त्यांच्या वयोवृद्ध माऊलीने असे म्हटले होते की महादेव ज्या दिवशी चुकेल त्यादिवशी मी त्याचे कान धरीन. पण, तो गरिबांचे भलं करील. यावर त्या माऊलीचा विश्‍वास होता. माऊलीचा हा विश्वास महादेव जानकर तडीस नेतील अशी आशा आहे.

Web Title: Prakash Patil's OpenSpace Article