वैद्यकीयसह इतर शाखांसाठीही 'प्रवेशाचा गेटवे'

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 जून 2016

पुणे - अभियांत्रिकीबरोबरच पुढील वर्षीपासून वैद्यकीय आणि त्याशिवाय अन्य शाखांसाठी देखील "प्रवेशाचा गेटवे‘ सुरू करा, त्यासाठी सरकार बरोबर राहील, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केली. 

पुणे - अभियांत्रिकीबरोबरच पुढील वर्षीपासून वैद्यकीय आणि त्याशिवाय अन्य शाखांसाठी देखील "प्रवेशाचा गेटवे‘ सुरू करा, त्यासाठी सरकार बरोबर राहील, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केली. 

अभियांत्रिकी, औषधनिर्माण, व्यवस्थापन शाखेतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर (एसआयएलसी) आणि तंत्र शिक्षण संचालनालयाने प्रवेशाचा गेटवे हा कार्यक्रम शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) आयोजित केला होता, त्या वेळी तावडे बोलत होते. "सकाळ‘चे संपादक मल्हार अरणकल्ले, "एसआयएलसी‘च्या सीओओ डॉ. अपूर्वा पालकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. सुभाष महाजन, विभागीय सहसंचालक डॉ. दिलीप नंदनवार, महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ. राजेंद्र हिरेमठ, उपसंचालक बी. एन. चौधरी, एन. बी. पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तावडे म्हणाले, ‘परीक्षेत मिळालेले गुण म्हणजे तुमची हुशारी नाही. प्रत्येकाकडे बुद्धिमत्ता असते; परंतु परीक्षेत गुण मिळाले नाहीत म्हणून खचून जाऊ नका. निश्‍चित केलेल्या शाखेत प्रवेश मिळाला नाही, तर दुसरा पर्याय निवडा. नव्या राज्य सरकारने मुलांवरील नापासाचा शिक्का पुसून टाकला आहे. परंतु, जे चार टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात, त्यांचे समुपदेशन सरकार करणार आहे. त्या विद्यार्थ्यांमधील कौशल्यानुसार प्रशिक्षण देऊन त्यांना यशस्वी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.‘‘ 

उद्योग सचिवांना बोलवा 
मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र यामुळे उद्योगक्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत. पुढील चार वर्षांनी कोणत्या क्षेत्रात, कोणत्या अभियांत्रिकी शाखेला अधिक संधी आहे, याची कल्पना विद्यार्थ्यांना आज मिळाली पाहिजे. त्यामुळे पुढील वर्षीपासून "प्रवेशाचा गेटवे‘साठी उद्योग सचिवांना देखील बोलवा, अशी सूचना तावडे यांनी केली. 

शिक्षणमंत्र्यांच्या सूचना 
- प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांना ऐनवेळी धावाधाव करावी लागते, त्यामुळे दहावीपासून कोणत्या शाखेला जायचे याचा विचार करा आणि त्याप्रमाणे कागदपत्रांची तयारी सुरू करा. 
- अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना कागदपत्रांसाठी कोणत्या अडचणी आल्या, त्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबद्दल इतरांना मार्गदर्शन करावे. 
- विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कामासाठी कोणतेही कागदपत्र नगरसेवक वा अधिकारी यांच्याकडून साक्षांकित करू नयेत, आता विद्यार्थ्यांनी स्वयंसाक्षांकित केलेली कागदपत्रे स्वीकारली जातात. 
- बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला जातातच असे नाही; परंतु ज्यांना जाण्याची इच्छा असेल, अशा पात्र विद्यार्थ्यांबाबत सरकार विचार करेल. 

विद्यार्थी संख्या कमी होतेय 
विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांनतर कर्जाच्या योजना, इंग्रजी आणि मराठी शाळा, शिक्षण संस्थांना असलेला 20 टक्के व्यवस्थापन कोटा यावर त्यांनी भाष्य केले. शिक्षकांची संख्या कमी आहे. दुसरीकडे बीएड, डीएड झालेले तरुण बेरोजगार आहेत, या प्रश्‍नावर तावडे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. शिक्षकांच्या नोकऱ्या देखील कमी होत आहेत. शाळेतील विद्यार्थी संख्या घटत राहील, तसे शिक्षक कमी होत राहतील. त्यामुळे अध्यापन करण्याची अतिशय आवड आहे, त्यांनाच आपण शिक्षक करूयात.‘‘ 

शिक्षणमंत्र्यांचे यशाचे फंडे 
स्वतःमध्ये प्रचंड आत्मविश्‍वास ठेवा. जगात दोनच शहाणे; एक समोरचा आणि दुसरा मी, असा दृष्टिकोन ठेवा. 
अंथरूण पाहून कधीच पाय पसरू नका. आधी पाय पसरा आणि मग अंथरूण गोळा करण्याची हिंमत ठेवा. 
जिथे जगाची विचार करण्याची क्षमता संपते, तेथून पुढे विचार करण्याची वृत्ती ठेवा.

Web Title: praveshacha gateway for all branches