
नवाब मलिक अटकप्रकरणी मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न सुरु; दरेकरांचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना इडीने अटक केली. त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी (ED) कोठडी सुनावण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर नवाब मलिक यांच्यावर सुडाने कारवाई केल्याचा आरोप महाविकास आघाडी करतेय. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ‘नवाब मलिक हटाव, देश बचाव’ अभियानाद्वारे हा आरोप खोडुन काढु, अशी प्रतिक्रिया माध्यमाशी बोलताना दिली. ते सोलापुरमध्ये बोलत होते.
प्रवीण दरेकर म्हणाले, “नवाब मलिक यांना भाजपने नाही तर न्याायालयाने कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सुडाने कारवाई केल्याचा आरोप अर्थहीन आहे.”
डॉक्टरांचे आंदोलन, एसटी आंदोलन सुरु आहे. त्यांच्याकडे राज्य सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही मात्र दाऊदशी संबंधित लोकांना वाचवण्यासाठी वेळ आहे, असा हल्लाबोल सुद्धा दरेकरांनी यावेळी केलाय.
एका बाजूला साधूंसंताचा महाराष्ट्र सांगायचे आणि दुसरीकडे दहशतवाद्यांना फडिंग करणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा, असा घणाघातही प्रवीण दरेकरांनी केला. तर या घटनेला मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप दरेकरांनी केला. ‘नवाब मलिक हटाव, देश बचाव’ अभियान सुरू केले असल्याचेही ते म्हणाले. या अभियानाद्वारे महाविकास आघाडीने भाजपवर केलेले आरोप आम्ही खोडुन काढु, असेही दरेकर म्हणाले.