esakal | महाराष्ट्र-मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाचा पिकांना फटका

बोलून बातमी शोधा

rain in pune
महाराष्ट्र-मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाचा पिकांना फटका
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरी बरसत आहेत. सोमवारी (ता. २६) दुपारनंतर सातारा, सांगली, पुणे, नगर, नांदेड, लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळ व मेघगर्जनेसह ‘पूर्वमोसमी’च्या सरी बरसल्या. तुरळक ठिकाणी गारपीट झाली. मांजरम (जि. नांदेड) शिवारात वीज पडून म्हैस व गाईचा मृत्यू झाला. पावसामुळे कांदा, गहू, द्राक्ष, आंबा व भाजीपाला पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. अचानक होत असलेल्या पावसामुळे शेतकरी चांगलाच अडचणी येण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहेत. मागील काही दिवसांत उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. दिवसभर उन्हाचा चटका जाणवत असला, तरी दुपारनंतर कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नगर, नाशिक, मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, विदर्भातील काही भागांत अचानक ढग भरून येत आहेत. अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे.

हेही वाचा: कोरोना रुग्णांचे होणार आता ऑडिट; महापालिकेचा निर्णय

पूर्वमोसमी पावसाचा हंगाम सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. त्यातच अनेक ठिकाणी कांदा काढणी सुरू असल्याने काढलेला कांदा झाकण्यासाठी धावपळ उडत आहे. तसेच वादळी पावसामुळे आंबा, द्राक्ष, गहू पिकांचेही नुकसान होऊ लागले आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण, कऱ्हाड तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पूर्वमोसमी पाऊस पडला. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील नेर्ले, पुण्यातील बारामती, नगर जिल्ह्यातील नेवासा, भेंडा परिसरातही सायंकाळी वादळी पाऊस पडला. मराठवाड्यातील नांदेडमधील नायगाव तालुक्यातील मांजरम व गडगा परिसरातही सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी पाऊस व विजेच्या कडकडाटासह गारा पडल्या. या दरम्यान मांजरम शिवारात वीज पडून म्हैस व गाईचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यातील रोहिणा, तांदुळजा परिसरातही वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडला. तर अहमदपूर येथे मेघगर्जनेसह तुरळक सरी पडल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धापवळ झाली.

असे झाले नुकसान

  • वादळाचा फळबागांना तडाखा

  • पावसाने पिकांना फटका

  • काढलेला कांदा भिजून नुकसान

  • काढणीला आलेल्या भाजीपाला पिकांचेही नुकसान

  • काही ठिकाणी तयार गहू पीक आडवे झाले

  • गारपिटीने आंब्यासह फळांना तडाखा

हेही वाचा: गुदमरलेल्या पुण्यात व्हेंटिलेटर दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष