esakal | गुदमरलेल्या पुण्यात व्हेंटिलेटर दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष

बोलून बातमी शोधा

Ventilator_
गुदमरलेल्या पुण्यात व्हेंटिलेटर दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरासह जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजविला असताना ससून रुग्णालयात गेल्या सहा महिन्यांपासून दुरुस्तीअभावी ३२ व्हेंटिलेटर ‘प्राणहीन’ अवस्थेत आहेत. ते सुरू करण्याची तसदी प्रशासन आणि नेत्यांनी घेतली असती तर शेकडो रुग्णांचे प्राण वाचले असते, हे वास्तव आहे.

वर्षाहून अधिक काळ कोरोनाची साथ सुरू असताना केवळ तात्पुरत्या कोविड रुग्णालयावरच शेकडो कोटी रुपये खर्च झाले आहेत. ‘पीएम केअर’ निधीतून ससून रुग्णालयाला ८६ व्हेंटिलेटर मिळाले. त्यापैकी ३२ बंद पडले; पण ते दुरुस्त करून पुन्हा वापरात आले नाहीत. व्हेंटिलेटरअभावी पुणेकर तडफडत असताना लालफितीचा हा कारभार धक्कादायक आहे.

हेही वाचा: पुण्यात लशींअभावी आज केंद्र बंद

ससूनमध्ये रोज कोरोना बळींची नोंद होते आहे. शहरातील सुविधा अपुऱ्या पडल्या आहेत. अशा परिस्थितीत हे ३२ व्हेंटिलेटर सुरू असते तर आतापर्यंत शेकडो लोकांचा जीव वाचला असता. ३२ पैकी २२ महापालिकेने ताब्यात घेतले आहेत; पण त्यातील एकही व्हेंटिलेटर अद्याप दुरुस्त करण्यात आलेला नाही.

''कोरोनाची पहिली साथ आली तेव्हाच महापालिकेकडे रुग्णालयासाठी बांधून तयार असलेल्या इमारतींमध्ये कायमस्वरूपी रुग्णालय सुरू केले असते तर पुणेकरांना फायदा झाला असता. ‘जम्बो’वर ३०० कोटी खर्च केले; पण ही तात्पुरती व्यवस्था आहे. तसेच महापालिका व शासनाच्या आरोग्य विभागातील पदे रिक्त आहेत. ही पदे भरली असती तर रुग्णांना चांगली सेवा मिळाली असती. ससूनमध्ये बंद पडलेले व्हेंटिलेटर दुरुस्त केले असते, पालिकेने न वापरलेल्या ४०० ऑक्सिजन बेडचा वापर केला असता तर लोकांचे प्राण वाचले असते.''

- डॉ. अभिजित मोरे, संघटनमंत्री आप

हेही वाचा: कोरोना रुग्णांचे होणार आता ऑडिट; महापालिकेचा निर्णय