पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता. 29) मतदान होणार आहे. येत्या शनिवारी (ता. 27) सायंकाळी सहाला निवडणूक प्रचार संपेल. या मतदारसंघात मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदारांना मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी राहील, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह 23 उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात एकूण 2296 मतदान केंद्रे आहेत. त्यात शहरी भागात 1261 आणि ग्रामीण भागात 1035 केंद्रांचा समावेश आहे. एकूण मतदान केंद्रांपैकी 237 केंद्रे "वेब कास्टिंग'द्वारे जोडली आहेत. त्यात कोरेगाव भीमासह 31 संवेदनशील मतदान केंद्राचा समावेश आहे.
मतदान केंद्रांवर महिला-पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांगा असतील. तसेच, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पार्किंगची सुविधा राहील. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पसह व्हीलचेअरची सुविधा असेल.
या मतदारसंघात 206 कोपरा सभा, 50 रॅली आणि 116 वाहनांना परवानगी देण्यात आली. "सी-व्हिजिल' ऍपद्वारे 186 तक्रारी प्राप्त झाल्या. निवडणुकीदरम्यान शिरूर, भोसरी आणि जुन्नरमधून 29 लाख 67 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर, 9 हजार 333 लिटर अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी दिली.
मतदान केंद्रांमध्ये बदल
मतदारसंघातील 69 मतदान केंद्रांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यात हडपसर येथील 35, भोसरी 20, शिरूर 12 आणि आळंदी येथील दोन केंद्रांचा समावेश आहे. या बदलाबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदारांना माहिती देण्यात येत आहे. मतदार चिठ्ठ्या (व्होटर स्लिप) वाटण्याचे काम जवळपास 70 टक्के पूर्ण झाले आहे. विधानसभानिहाय केवळ महिला अधिकारी-कर्मचारी असलेले सहा सखी मतदान केंद्र असतील.
शिरूर लोकसभा निवडणूक - 2019
एकूण मतदार- 21 लाख 73 हजार 527
केंद्रे -2296
संवेदनशील मतदान केंद्रे -31
निवडणूक कर्मचारी -12 हजार 685
ईव्हीएम मशिन - 5512
व्हीव्हीपॅट मशिन - 3066
पोस्टल मतदान - 854
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.