'हिंदू राष्ट्रा'साठी सरसंघचालकांना राष्ट्रपती बनवा- शिवसेना

टीम ई सकाळ
शुक्रवार, 9 जून 2017

मतांचे गणित
सध्या कागदावरील गणित पूर्णपणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूचे आहे. आघाडीतील २३ घटक पक्षांसह ४८ टक्के मते राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जे १७ पक्ष आहेत त्यांची मते ३६ टक्के आहेत. त्यामुळे विजय राष्ट्रीय लोकशाही आघाडीचाच होणार, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे. 

मुंबई : राममंदिर, समान नागरी कायदा, ३७० कलम हे रेंगाळलेले देशहिताचे प्रश्न सोडविण्यासाठी हिंदुत्वाचा ‘रबर स्टॅम्प’ राष्ट्रपती भवनात विराजमान झाला तर बिघडले कुठे? असा सवाल करीत हिंदू राष्ट्रावर ‘मोहोर’ उमटविणाराच राष्ट्रपती हवा, असे सांगत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपती करण्याची सूचना मांडली शिवसेनेने मांडली.   

भाजपला या निवडणुकीतही कोंडीत पकडण्याचा राजकीय डाव शिवसेनेने टाकल्याचे दिसते. आजपर्यंत सेक्युलर सरकारांचे ‘रबर स्टॅम्प’ राष्ट्रपती भवनात बसले, अशी टीका करीत देशाच्या राष्ट्रपती भवनात ‘जनतेचा’ माणूस व हिंदुत्ववादी विचारांचा माणूस हवा असेल तर सरसंघचालकांना राष्ट्रपती करून हिंदू राष्ट्र संकल्पनेवर शिक्कामोर्तब करायला हवे, असे शिवसेनेने 'सामना' या मुखपत्रात म्हटले आहे. 

शान राखावी
'राजकारणातून निवृत्त झालेल्यांची सोय राज्यपालपदी लावून त्यांना राजभवनात पाठवले जाते. त्यामुळेच त्या पदाचे महत्त्व कमी झाले आहे. राष्ट्रपती भवनात डॉ. अब्दुल कलाम किंवा प्रणव मुखर्जींसारखी व्यक्ती बसली की त्यातल्या त्यात त्या पदाची शान राहते, नाहीतर सत्ताधारी पक्षास सोयीची असलेली व्यक्ती तेथे ब्रिटिशांच्या बग्गीतून थाटामाटात पाठवली जाते. हा एक थाटामाटाचा जंगी लग्नसोहळाच ठरतो. त्यामुळे येत्या २० जुलैला कुणाच्या डोक्यावर या वरातीचे बाशिंग बांधले जातेय तेच आता पाहायचे.'

अडवानी, जोशी डळमळीत
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचे पक्षातील स्थान डळमळीत झाले आहे. सुषमा स्वराज यांच्याबरोबरीने ओरिसाच्या राज्यपाल महिलेचे नावही चर्चेत आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक हेदेखील रिंगणात आहेत, मात्र आम्ही आजही सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावावर ठाम आहोत, असे शिवसेनेने म्हटले आहे. 
 

Web Title: Presidential Election Shiv Sena suggests RSS chief bhagwat rashtrapati