राज्यात मूग १५०० ते ८९४० रूपये;  पुण्यात ब्रॅंडेड मुगाला ७५०० ते ८५०० रुपये 

प्रतिनिधी
Friday, 4 September 2020

चांगला झालेला पाऊस व पेरणी,यामुळे यंदाच्या खरिपात मूगाचे चांगले उत्पादन होण्याचा अंदाज कृषीविभागाने वर्तविला आहे.पुढील सहा महिन्यात दरामध्ये विशेष बदल होणार नसल्याचा अंदाज नहार यांनी व्यक्त केला आहे.

पुणे - पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.३) सुमारे १५ क्विंटल मुगाची आवक झाली. यावेळी ब्रॅंडेड मुगाला ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपये दर होता. सध्याचे दर हे गेल्या वर्षीच्या तुलनेत १० ते २० टक्क्यांनी कमी आहेत. सध्या कोरोना संकटामुळे हॉटेल, खानावळी बंद अद्यापही बंद आहे. मोठी मागणी नसल्याने दर कमी असल्याचे व्यापारी नितीन नहार यांनी सांगितले. दरम्यान, चांगला झालेला पाऊस आणि पेरणी, यामुळे यंदाच्या खरिपात मूगाचे चांगले उत्पादन होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. पुढील सहा महिन्यात दरामध्ये विशेष बदल होणार नसल्याचा अंदाज नहार यांनी व्यक्त केला आहे. तर, पुणे बाजार समितीमध्ये शेतकरी माल येत नसल्याने मुगाची प्रामुख्याने आवक ही ब्रॅण्डेंड उद्योगांकडूनच होत असते, असेही नहार यांनी सांगितले.

नगरमध्ये ३००० ते ६५०० रूपये क्विंटलचा दर 
नगर - नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या महिनाभरापासून मुगाची जोरदार आवक होत आहे. गुरूवारी येथे २ हजार क्विंटल मुगाची आवक झाली. त्यांना तीन ते साडेसहा हजार रुपयांचा दर मिळाला. जिल्ह्यामध्ये नगर व पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुगाचे उत्पादन घेतले जाते. यंदा दोन्ही तालुक्यांत मिळून सुमारे ३५ हेक्टर क्षेत्रावर मुगाचे पीक घेतले. हे पीक हाती आले असल्याने बाजारात मुगाची आवक वाढली आहे. रविवारी (ता. ३०) मुगाची २०६० क्विंटलची आवक झाली. त्यावेळी ४००० ते ५५०० रुपयांचा दर मिळाला. सोमवारी (ता. २८) १७५१ क्विंटलची आवक झाली. त्यास ३५०० ते ६३०० रुपये व सरासरी ४९०० रुपयांचा दर मिळाला. रविवारी (ता. २७) रोजी १६५० क्विटंलची आवक झाली. त्यास ३५०० ते ६५०० व सरासरी ५००० रुपयांचा दर मिळाला आहे. सध्या नगर शहरात जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातूनही आवक होत आहे.

अकोल्यात सरासरी ५१०० रुपये 
अकोला - मुगाचा नवीन हंगाम सुरु झाला आहे. गुरुवारी (ता.३) अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाला कमीत कमी ३५०० व जास्तीत जास्त ६५०० रुपयांचा दर मिळाला. सरासरी ५१०० रुपये दराने विक्री झाली. ७३ क्विंटलची आवक झाली. यंदा रोगांच्या प्रादुर्भावामुळे मुगाच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे बाजारात नवीन मुगाची आवक मागील काही वर्षांच्या तुलनेने सध्या कमीच असल्याचे सूत्रांकडून  सांगण्यात आले. 

जिल्ह्यात यंदा लागवड झालेल्या २२ हजार हेक्टरवरील मुगाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांनी हे पीक नांगरूणही टाकले होते. प्रादुर्भावातून ज्यांचे पीक वाचले त्यांची काढणी सुरु झाली. हा नवीन मूग अकोल्यासह अकोट, मूर्तीजापूर, बाळापूर आदी बाजार समित्यात विक्रीसाठी येऊ लागला आहे. प्रामुख्याने अकोल्याची बाजारपेठ मोठी असल्याने या ठिकाणी इतरही भागातील धान्य विक्रीला येते. गुरुवारी बाजारात ७३ क्विंटल मुगाची आवक झाली.

नांदेडमध्ये ५३००  ते ५४०० रूपये दर
नांदेड - नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२) मुगाची २ क्विंटल आवक झाली. मुगाला प्रतिक्विंटल ५३०० ते ५४०० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामातील मुगाची आवक सुरु झाली आहे. परंतु, दरवर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमी आहे. बुधवारी (ता.२६) ३ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटलला ४९०० ते ५००० रुपये मिळाले. शुक्रवारी (ता.२८) ६ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटलला ४९०० ते  ५००० रुपये मिळाले. 

मुगाची शनिवारी (ता.२९) ३ क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटलला ४९०० ते ५००० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता.३१) ३ क्विंटल आवक झाली. त्यावेळी ५४०० ते ५५०० रुपये दर मिळाले. बुधवारी  (ता.२) २ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटलला ५३०० ते ५४०० रुपये मिळाले, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

औरंगाबादमध्ये ५००० ते ६५०० रूपये दर
औरंगाबाद  - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.३) मुगाला ५००० ते ६५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये मुगाची २७ ऑगस्ट रोजी २२ क्विंटल आवक झाली. त्यावेळी मुगाला ४५०० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २८ ऑगस्ट रोजी मुगाची आवक २० क्विंटल, तर दर ४५०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २९ ऑगस्ट रोजी २६ क्विंटल आवक झाली. मुगाला ४४०० ते ५२०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. ३१ ऑगस्टरोजी मुगाची आवक ३५ क्विंटल, तर दर ४७०० ते ५५०० रुपये प्रति क्विंटल राहिले. 

एक सप्टेंबर रोजी १५ क्विंटल आवक झालेल्या मुगाला ५०००  ते ६५०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. २ सप्टेंबर रोजी मुगाची आवक २४ क्विंटल, तर दर ४५०० ते ६५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

नागपुरात मूग ५५०० रुपये क्विंटल  
नागपूर  - विदर्भातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये मूग दरात तेजी अनुभवली जात आहे. अमरावती बाजार समितीत नव्या मुगाची आवक होत आहे. अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट परिसरात त्यासोबतच अचलपूर भागातही शेतकऱ्यांव्दारे मुगाची लागवड होते. अमरावती बाजार समितीत सद्यस्थितीत मुगाला ५५०० सात हजार रुपये असा दर मिळत आहे. 

कीड रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने उत्पादकता प्रभावित झाली आहे. त्यामुळे बाजारातील आवक ही  कमी असल्याने दरात तेजी आल्याचे व्यापाऱ्याने सांगितले. वाशिम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत मुगाची आवक २५ क्विंटल इतकी अत्यल्प झाली. कारंजा बाजार समितीत मुगाला कमीत कमी ३८९५, तर जास्तीत जास्त ४८१० रुपयांचा दर मिळाला. नागपूर बाजार समितीत मात्र सध्या स्थितीत मुगाची आवक होत नसल्याचे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: price of Mug in the state is Rs 1500 to 8940