सॅनिटायझर, मास्कचे दर होणार आता निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

वाढीव दराने मास्कच्या खरेदीला चाप 
कोरोनाचा सामना करण्यासाठी नागरिक मास्क आणि सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. मात्र याचाच फायदा घेत काही जिल्ह्यांत आरोग्य विभागाने १७ ते १८ रुपयांचा मास्क थेट २०० रुपयांना खरेदी केल्याचे समोर आले आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले. केंद्र सरकारकडून ‘एन-९५’ मास्कचा पुरवठा करण्यात येत आहे.

मुंबई - मास्क, सॅनिटायझरसाठी काही कंपन्या जादा दर आकारीत असल्याने नागरिकांची लूट केली जात आहे. त्यामुळे सॅनिटायझर, मास्कचे दर निश्‍चित करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. येत्या आठ दिवसांत यावर निर्णय होणार असून त्याबाबतचा अधिसूचना काढण्याची प्रक्रियाही सुरू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या वाढत्या धोक्‍यासह उपचाराच्या खर्चामुळे नागरिक हैराण झाले असल्याने सरकारने कोरोना तपासणी, रुग्णवाहिकेचे दर निश्‍चित केले आहेत. मात्र, मास्क, सॅनिटायझरचे दर निश्‍चित नसल्याने जादा दर आकारले जात असून ग्राहकांची लूट होत आहे. ‘‘याबाबत अन्न आणि औषध प्रशासन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे.  संबंधित विभागाशी पत्रव्यवहारही केला आहे.  मास्क आणि सॅनिटायझरसाठी जादा किंमत लावता कामा नये, असा निर्णय येत्या आठ दिवसांत जनहिताच्या दृष्टिकोनातून घेतला जाणार आहे,’’ असे टोपे यांनी सांगितले.

मोठी बातमी - राज्यात ८ जुलैपासून हॉटेल्स आणि लॉज होणार सुरु, सरकारने दिली सशर्त परवानगी

मास्कचे वाटप सार्वजनिक आरोग्य विभागाकडून रुग्णालयांमध्ये केले जाते. शिवाय,  कॅबिनेटमध्ये ही याबाबत चर्चा करून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने कोरोनाशी संबंधित असलेल्या सर्व बाबी खरेदी न करता त्या त्या जिल्हाधिकारी आणि स्थानिक आयुक्तांनी मिळून खरेदी करावेत. हाफकिनच्या दराने ते खरेदी करावेत, अशा मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने कोणतीही खरेदी केलेली नाही. शिवाय, मास्कचा पुरवठा झाला असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना मास्क खरेदी करण्याची गरज नाही. अत्यावश्‍यक असल्यास त्यांना खरेदीचे अधिकार दिले असून, जर अनावश्‍यक आणि जास्तीच्या दराने खरेदी झाली असेल तर त्याबाबत चौकशी करण्यात येईल.

मास्क आणि सॅनिटायझरचा विक्रीचा दर निश्‍चित केला जाणार आहे. ‘एमआरपी’ जशी असते तशी मर्यादा आणली जाईल. याबाबत अधिसूचना  काढण्यात येणार आहे. 
- राजेश टोपे, आरोग्यमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The price of sanitizer and mask will be fixed now rajesh tope