महाराष्ट्रात दारु, लॉटरी महागणार

टीम ई सकाळ
शनिवार, 18 मार्च 2017

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात देशी व विदेशी मद्यावरील मूल्यवर्धित कर आणि साप्ताहिक लॉटरीवरील करवाढ वगळता इतर कोणत्याही बाबीवर करवाढ होणार नसल्याचे स्पष्ट करीत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.

मुंबई - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात देशी व विदेशी मद्यावरील मूल्यवर्धित कर आणि साप्ताहिक लॉटरीवरील करवाढ वगळता इतर कोणत्याही बाबीवर करवाढ होणार नसल्याचे स्पष्ट करीत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.

राज्यात चालू आर्थिक वर्षात (2016-17) कर संकलनाचा सुधारित अंदाज 1 लाख 37 हजार 230 कोटी रुपये एवढा असल्याचे सांगत करसंकलनाची उद्दिष्टपुर्ती करण्यात राज्य सरकारला यश येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

वस्तू व सेवा कर कायद्यातील (जीएसटी) तरतुदी आणि त्याचे महत्त्व स्पष्ट करीत असताना ही कर आकारणी लागू झाल्यानंतर राज्याच्या कर महसूलावर 14 टक्के वाढ गृहित धरण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, राज्याला मुंबईतील जकात आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील करांची नुकसान भरपाई मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, समुद्र किनाऱ्यापासून 12 सागरी मैल अंतरावर होणारे व्यवहार राज्यातील व्यवहार गृहित धरण्याचा प्रस्ताव जीएसटी परिषदेत एकमताने मंजुर झाला आहे. याचा महाराष्ट्र राज्याला विशेष फायदा होईल, असे प्रतिपादन मुनगंटीवार यांनी केले.

महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधीकरणाच्या तीन खंडपीठांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे. महसूलनिर्मितीच्या उपायाबरोबरच वित्तीय शिस्त पाळण्याचा सरकारचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Prices of wine and lottery hiked