Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण पुन्हा दिल्लीच्या राजकारणात?

महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पुन्हा एकदा दिल्लीच्या राजकारणात प्रवेश होण्याची शक्यता आहे.
Prithviraj Chavan
Prithviraj Chavansakal

महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पुन्हा एकदा दिल्लीच्या राजकारणात प्रवेश होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने साताऱ्याची जागा काँग्रेसकडे सोपवल्यास लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास पृथ्वीराज चव्हाण तयार होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने अमर काळे यांच्यासाठी वर्धा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिल्याने सातारा मतदारसंघ काँग्रेसकडे सोपवण्यास हरकत नसावी, अशी चर्चा सुरु झाली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ कायम धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या पाठीशी उभा रहातो असे मानले जाते. ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील यांनी रिंगणातून प्रकृतीचे कारण सांगत माघार घेतल्याने या मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’ उमेदवारांच्या शोधात आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती अन् ते विजयी झाले होते.

मात्र लोकसभेचा राजीनामा देत ते भाजपकडून लढले अन् पोटनिवडणुकीत पराभूत झाले. त्या निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी मागितला, पण त्यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षात एकवाक्यता नसल्याचे सांगत ‘राष्ट्रवादी’ने नकार दिला. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या नात्याने कमालीचे वाद होते.

सिंचनक्षेत्रासंबंधातील आकडेवारीमुळे या दोन नेत्यात परस्परांबद्दल गैरसमज निर्माण झाला होते. त्यामुळेच या मतदारसंघातून चव्हाण लढले तर त्यांच्या विजयाची हमी देण्यासंबंधी तत्कालिन राष्ट्रवादी काँग्रेसने हतबलता व्यक्त केली होती. आता अजित पवार बाहेर पडल्याने चव्हाणांना पाठिंबा देण्याचा विचार होऊ शकतो असे मानले जाते. सातारा परिसरातील मतदार सुजाण आहे, त्यामुळे तो जाणकार उमेदवाराला मत देईल असे मानले जाते.

या मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा महायुतीने अद्याप केलेली नाही .हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटयाचा आहे आणि येथील उमेदवार शरद पवार ठरवतील असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेतल्याने हा मतदारसंघ काँग्रेसकडे जाऊ शकेल, अशी चर्चा सुरु झाली आहे.

या भेटीत दोघांनी राजकारणाची चर्चा केली. कऱ्हाड येथे झालेल्या या भेटीमुळे पृथ्वीराज चव्हाण पुन्हा दिल्लीत परतण्याची चर्चा सुरु झाली आहे. दिल्लीत भाजपप्रणित राजकारणाला चोख उत्तर देण्यासाठी चव्हाणांसारखा ज्येष्ठ नेता काँग्रेससाठी जमेची बाजू ठरु शकेल असे मानले जाते .

कऱ्हाड मतदारसंघाची बाजू विधानसभेत मांडली तरी पृथ्वीराज चव्हाण यांचे खरे स्थान राष्ट्रीय राजकारणात आहे. सातारा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. या जागेबद्दलचा निर्णय शरद पवार यांनी घ्यायचा आहे आणि तो त्यांच्या पक्षाला मिळालेला मतदारसंघ आहे, असे चव्हाण म्हणाले. चव्हाणांनी ‘तुतारी’वर आमच्या पक्षातर्फे लढावे अशी चर्चा ‘राष्ट्रवादी’तील काही नेत्यांनी सुरु केली आहे.

मात्र पृथ्वीराज चव्हाण पंजा हे चिन्ह सोडून कोणत्याही अन्य पक्षातर्फे लढण्यास राजी होणार नाहीत. त्यांनी १९९९ रोजीही पक्षांतरास नकार दिला होता. सातारा मतदारसंघ कॉंग्रेसकडे वळवला तर त्या बदल्यात ‘राष्ट्रवादी’ला काय मिळेल असा प्रश्न समोर येवू शकतो. मात्र वर्धा मतदारसंघात काँग्रेसने अमर काळे यांना राष्ट्रवादीत जाण्यास परवानगी दिली आहे. तीच अदलाबदल समजता येईल का? असा एक मतप्रवाह आहे.

स्वत: शरद पवार आणि त्यांचे निकटवर्तीय अन्य पर्यायांचा विचार करतात की बाबांच्या नावाला मान्यता देतात याकडे लक्ष लागले आहे. बाळासाहेब पाटील हे ज्येष्ठ नेते असले तरी दिल्लीच्या राजकारणात जाण्यास ते तयार नाहीत. शशिकांत शिंदे यांच्यावर काही आरोप आहेत, त्याचा प्रतिकूल परिणाम होणार काय? याचीही चाचपणी घेतली जात आहे. भिवंडी हा मतदारसंघ काँग्रेसने ‘राष्ट्रवादी’ला द्यावा, अशी मागणी होऊ शकते अन् सातारा चव्हाणांसाठी सोडावा अशी मागणी पुढे येऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com