राज्यात खासगी सावकारांना "अच्छे दिन'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

प्रलंबित कर्जमाफी अन्‌ शेती व बिगरशेतीच्या वाढलेल्या थकबाकीमुळे 31 पैकी 17 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांचा "एनपीए' वाढला आहे. त्याचा परिणाम बॅंकांच्या कर्जवाटपावर झाला. मात्र, राज्यातील खासगी परवानाधारक सावकारांना "अच्छे दिन' आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

अकरा हजार सावकारांनी केले दीड हजार कोटींचे कर्जवाटप
सोलापूर - प्रलंबित कर्जमाफी अन्‌ शेती व बिगरशेतीच्या वाढलेल्या थकबाकीमुळे 31 पैकी 17 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांचा "एनपीए' वाढला आहे. त्याचा परिणाम बॅंकांच्या कर्जवाटपावर झाला. मात्र, राज्यातील खासगी परवानाधारक सावकारांना "अच्छे दिन' आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 2018-19 मध्ये राज्यातील 11 हजार 27 खासगी सावकारांनी सात लाख 31 हजार 752 कर्जदारांना एक हजार 438 कोटी 89 लाखांचे कर्जवाटप केल्याची माहिती सहकार आयुक्‍त कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

लातूर व अमरावती या दोन विभागांत साडेतीन लाख शेतकऱ्यांना सावकारांनी सहाशे कोटी रुपयांचे कर्जवाटप केल्याचे सहकार आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले. परवानाधारक खासगी सावकार गरजूंना शेती, बिगरशेतीसाठी कर्ज देतात. बहुतांश सावकारांकडून बिगरशेतीला नव्हे, तर शेतकऱ्यांनाच मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप करण्यात आले आहे. व्याज व मुद्दल वेळेवर परतफेड न केल्यास संबंधित सावकाराने कर्जदार शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्याच्या मागील दहा महिन्यात सुमारे 892 तक्रारी संबंधित जिल्हा उपनिबंधकांकडे प्राप्त झाल्या आहेत.

राज्यातील सततचा दुष्काळ, शेतीमालाचे अस्थिर दर, राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून कर्जवाटपाला ठेंगा आणि सहकारी बॅंका अडचणीत, या सर्व बाबींमुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव खासगी सावकारांचा दरवाजा ठोठावा लागतो. शेतजमीन गेल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे.

राज्याची सद्यःस्थिती
खासगी सावकार - 11,027
कर्जवाटप - 1,438.89 कोटी रुपये
कर्जदार - 7,31,752
सावकारांची येणे बाकी - 3,872 कोटी रुपये

खासगी सावकारांना कर्जवाटप करण्याची टक्‍केवारी निश्‍चित करून दिली आहे. त्यापेक्षा अधिक व्याज आकारणी करणाऱ्या खासगी सावकारांचा परवाना रद्द केला जातो. सावकारकीतून जमीन लुबाडण्याच्या तक्रारी दरवर्षी वाढत आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय.
- अविनाश देशमुख, उपनिबंधक, सोलापूर

Web Title: Private Money Lender Acche Din Loan Distribution