पनवेलमध्ये प्रचार शिगेला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

कळंबोली - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका २१ तारखेला होत असल्यामुळे तालुक्‍यातील सर्वच पक्षांच्या उमेदवारांचा प्रचाराचा झंझावात सुरू आहे. रविवारी मतदार घरीच असल्याने मतदारांच्या गाठी-भेटी घेण्यासाठी प्रत्यक्ष घरी भेट घेण्यावर उमेदवार व कार्येकर्ते अधिक लक्ष देत आहेत. 

कळंबोली - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका २१ तारखेला होत असल्यामुळे तालुक्‍यातील सर्वच पक्षांच्या उमेदवारांचा प्रचाराचा झंझावात सुरू आहे. रविवारी मतदार घरीच असल्याने मतदारांच्या गाठी-भेटी घेण्यासाठी प्रत्यक्ष घरी भेट घेण्यावर उमेदवार व कार्येकर्ते अधिक लक्ष देत आहेत. 

वावंजे जिल्हा परिषद मतदारसंघात व दोन पंचायत समिती गणात सद्यस्थितीत ग्रामीण भागात तीन दिवस मोठ्या प्रमाणात प्रचाराचा धुरळा उडताना दिसत आहे.  मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आठ दिवस शिल्लक असताना निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांची ओळख व्हावी आणि निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहचावे यासाठी सर्वच उमेदवार प्रयत्न करत आहेत. त्यासाठी गावे, वाड्या, तसेच दुर्गम भागात प्रचार करण्यावर उमेदवारांचा भर आहे. 

वावंजे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या पार्वती प्रवीण सफरे, शेकाप आघाडीच्या योगिता पारधी निवडणूक लढवित आहेत; तर वावंजे पंचायत समिती गणातून शेकाप आघाडीचे काशिनाथ पाटील, भाजपचे ज्ञानेश्‍वर चोरमेकर, तसेच चिंध्रण पंचायत समिती गणातून भाजपच्या कमळाबाई देशेकर, शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या योगिता देशेकर निवडणूक लढवित आहेत. जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर यांनी शेकाप सोडून भाजपमध्ये प्रवेश करून पत्नी कमळाबाई यांना रिंगणात उतरवले आहे; तर त्यांच्याच कुटुंबातून शेकापने योगिता यांना उभे केले असल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. वावंजे पंचायत समितीचे  शेकापचे उमेदवार काशिनाथ पाटील निवडून आल्यास पनवेल पंचायत समितीचे सभापती पदाचे दावेदार असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढत असल्याने जिकडे तिकडे पक्षाचे झेंडे, प्रचारपत्रिका, पक्षांच्या चिन्हाच्या माळा पाहाण्यास मिळत आहेत. काशिनाथ पाटील यांनी कोलवाडी, पालेबुद्रूक, वलप या गावात मतदारांना प्रत्यक्ष भेटीवर भर दिला आहे; तर देशेकर प्रचार रॅली काढणार आहेत.

Web Title: Promotions peak in Panvel