पीएसआय होणार पुन्हा हवालदार!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

नागपूर - पोलिस विभागांतर्गत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक अर्हता परीक्षेत नापास झाल्यानंतरही मुंबई पोलिस दलात १९६ जणांना पोलिस उपनिरीक्षकपदावर (पीएसआय) पदोन्नती दिल्या गेल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रकाशित होताच राज्यभरासह पोलिस महासंचालक कार्यालयात खळबळ उडाली. ज्या नापास पोलिस कर्मचाऱ्यांना पीएसआय बनविण्यात आले होते, अशांना पुन्हा हवालदार बनविण्यात येण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

२०१३ मध्ये घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक अर्हता परीक्षेतील पास कर्मचाऱ्यांच्या यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाला. अनेक नापास पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस उपनिरीक्षक बनविण्यात आले आहे. या संदर्भात ‘सकाळ’ने वृत्तमालिका प्रकाशित केली. वृत्तमालिकेची दखल पोलिस महासंचालक कार्यालयासह आस्थापना विभागानेही गांभीर्याने घेतली. 

ज्या पोलिस कर्मचाऱ्याला चुकीने पदोन्नती देण्यात आली, अशा कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशीत बाजू मांडण्याची संधी देऊन पदोन्नती रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांनी ‘सेटिंग’ करून पीएसआय पद मिळवले, त्यांची गोची झाली आहे. आस्थापना विभागाने यापूर्वी सदोष यादी जाहीर केली होती. त्यामुळे हा सर्व घोळ झाल्याची चर्चा आहे.

सेवाज्येष्ठता यादी कधी?
अर्हता परीक्षेत १८ हजार कर्मचारी उत्तीर्ण झाले होते. मात्र, पोलिस महासंचालक कार्यालय आणि आस्थापना विभागाने जाणीवपूर्वक सदोष सेवाज्येष्ठता यादी जाहीर केली. अनेक नापास कर्मचाऱ्यांना पीएसआयपदी नियुक्‍ती देण्यात आली. आतापर्यंत नापास झालेल्या केवळ ३२ जणांना पुन्हा हवालदार केल्याची माहिती आहे.

Web Title: PSI Promotion Issue Police