जनआरोग्य योजनेतील रुग्णालये वाढली

तात्या लांडगे
मंगळवार, 9 जुलै 2019

राज्याची स्थिती
जनआरोग्य योजनेतील दवाखाने - ४९२
योजनेंतर्गत रुग्णालयांचे प्रस्ताव - १,५००
प्रस्तावित वाढ - ५००
दरवर्षीचे (रुग्ण) लाभार्थी - ९७.२९ लाख

सोलापूर - महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या राज्यातील ४९२ रुग्णालयांमधून दरवर्षी सरासरी ७९ लाख रुग्णांवर उपचार केले जातात. ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांची दुरवस्था झाल्याने सर्वसामान्यांना खासगी रुग्णालयांतून महागडे उपचार घ्यावे लागत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता या दोन्ही योजनांमध्ये आणखी ५०० रुग्णालयांची वाढ करण्यात येणार आहे. ऑगस्टपासून त्या ठिकाणी ही सेवा उपलब्ध होणार आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेंतर्गत सोलापुरातील १९ दवाखाने असून, आणखी ३३ रुग्णालयांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. राज्यभरातून अशा प्रकारच्या एक हजार ५०० रुग्णालयांनी प्रस्ताव पाठविले आहेत. यातून ५०० रुग्णालयांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी संबंधित रुग्णालयांची नावे निश्‍चित करून मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तत्पूर्वी, रुग्णालयांच्या वाढीला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.

जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रे अथवा उपकेंद्रांची आणि उपजिल्हा रुग्णालयांची दुरवस्था झाल्याने सर्वसामान्यांकरिता या दोन योजनांची व्याप्ती वाढविण्याचे नियोजन सरकारने केले आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ९७१ आजारांचा समावेश असून, दीड लाख रुपयांपर्यंत मोफत, तर आयुष्मान भारत योजनेंतर्गत एक हजार ३०० आजारांवरील पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जात आहेत.

महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेंतर्गत ४९२ खासगी व सरकारी दवाखान्यांची गरज आहे. ग्रामीण भागातील जनतेचा कल या योजनेकडे वाढल्याने आता त्यात नव्याने ५०० रुग्णालयांची वाढ करण्यात येणार आहे. 
- डॉ. सुधाकर शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जनआरोग्य योजना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public Health Scheme Hospital Increase