पुण्यात 'स्वाइन फ्ल्यू'च्या रुग्णांची सर्वाधिक नोंद

राज्यात 1 जानेवारी ते 10 ऑक्टोबर दरम्यान स्वाइन फ्ल्यूचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत.
Swine Flu patients
Swine Flu patientssakal
Summary

राज्यात 1 जानेवारी ते 10 ऑक्टोबर दरम्यान स्वाइन फ्ल्यूचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत.

पुणे - राज्यात 1 जानेवारी ते 10 ऑक्टोबर दरम्यान स्वाइन फ्ल्यूचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत. लांबलेला पाऊस, विषम वातावरण असे वातावरण या विषाणूंच्या संसर्गासाठी पोषक ठरते. त्यामुळे फ्ल्यू सदृश लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी दुखणे अंगावर काढू नका. तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सोमवारी करण्यात आले.

राज्यात कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी होत असतानाच स्वाइन फ्ल्यूच्या ‘एच१एन१‘ विषाणूंच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे नोंदविण्यात आले आहे. राज्यात गेल्या दहा महिन्यांमध्ये स्वाइन फ्ल्यूच्या तीन हजार 585 रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी एक हजार 228 (34 टक्के) रुग्ण एकट्या पुण्यातील आहेत. स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांची चार आकडी नोंद असलेले पुणे हे राज्यातील एकमेव शहर ठरले आहे. त्याच बरोबर राज्यातील स्वाइन फ्ल्यूचे सर्वाधिक मृत्यू पुण्यातच झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. या पार्श्वभूमिवर सार्वजनिक आरोग्य विभागाने हे आवाहन केले आहे.

काय काळजी घ्यावी?

- सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे अशी फ्ल्यू सदृश लक्षणे असलेल्या रुग्णांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. त्यामुळे स्वाइन फ्ल्यूच्या संसर्ग रोखण्यास मदत होईल.

- मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार असे अतिजोखमीचे आजार असणाऱ्या रुग्णांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा आवर्जून वापर करावा. त्यामुळे विषाणूंच्या संसर्गास प्रतिबंध होऊ शकतो.

- फ्ल्यूची लक्षणे असलेल्या रुग्णांनी वेळ न घालवता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. त्यातून उपचारातील गुंतागुंत टाळणे शक्य होते.

पुण्यात मृत्यूदर चार टक्के

पुणे जिल्ह्यात स्वाइन फ्ल्यूच्या एक हजार 228 पैकी 46 (4 टक्के) रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. उर्वरित 96 टक्के रुग्ण खडखडीत बरे झाले आहेत. काही रुग्णांना इक्मो या अद्ययावत वैद्यकीय उपकरणांवर ठेऊन त्यांचे प्राण वाचविण्यासाठी शहरातील डॉक्टरांनी यशस्वी प्रयत्न केले.

इतर राज्यातील मृत्यू 14

राज्यात स्वाइन फ्ल्यूच्या 204 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. देशातील इतर राज्यांमध्ये या विषाणूजन्य आजाराने मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 14 आहे. त्यात गुजरातमधील एका आणि मध्य प्रदेशमधील 13 रुग्णांचा समावेश आहे, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले.

प्रमुख जिल्ह्यातील स्वाइन फ्ल्यू

जिल्हा ........ बाधित रुग्ण ....... मृत्यू

पुणे ............ 1228 ................ 46

ठाणे ........... 564 .................. 16

नागपूर ........ 524 .................. 28

मुंबई ........... 386 ................. 2

नाशिक ......... 244 ................ 15

कोल्हापूर ........ 192 ............... 19

‘राज्यात साथरोग सर्व्हेक्षणाचे काम चांगले होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नोंदी होत आहेत. त्याचा परिणाम म्हणून इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढल्याचे दिसते. वातावरण हे एक रुग्णसंख्या वाढीमागचे एक कारण आहे. सकाळी उन्हाचा चटका, संध्याकाळी पाऊस आणि रात्री हवेत वाढलेला गारठा असे वातावरण विषाणूजन्य रोगांच्या संसर्गास पूरक असते. त्यामुळे स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण वाढताना दिसतात. तसेच, गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू होता. त्याचा परिणाम म्हणून स्वाइन फ्ल्यूचा ‘एच१एन१‘ विषाणूंचा संसर्ग कमी झाला होता. आता कोरोना कमी झाल्याने स्वाइन फ्ल्यू पुन्हा वाढत आहे,'

- डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्व्हेक्षण अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com