Baramati crime News: बारामतीत टग्यांच्या बाजारात 'मुळशी पॅटर्न'चा थरार; तरुणांनी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati crime News

Baramati crime News: बारामतीत टग्यांच्या बाजारात 'मुळशी पॅटर्न'चा थरार; तरुणांनी...

Baramati crime: पवारांची बारामती म्हणून ओळख असणाऱ्या बारामतीत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे. खून, गोळीबार, चोरी, असे गुन्हे बारामतीत सातत्याने घडत आहेत. १७ डिंसेबर रोजी बारामती शहरात दहशत पसरवण्याच्या हेतूने मद्यधुंद अवस्थेतील चार ते पाच जणांनी शहरात खळबळ माजवली आहे. दोन दुचाकीवरून हातात कोयते घेत आज शहरातील पाचहून अधिक हॉटेलमध्ये धुमाकूळ घातला.

अनेक हॉटेलचे त्यांनी काचा फोडून नुकसान केले असून काही दुचाक्यांचेही नुकसान केले आहे. त्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

काल संध्याकाळी सातच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील रेल्वे गेटनजीक एकाचा मोबाईल हिसकावत एका दुकानाची मोडतोड केली, त्यानंतर तेथून पाटस रस्त्यावरील सराफ पेट्रोलपंपावर पेट्रोल भरल्यावर पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला, त्यात एका व्यक्तीला कोयता लागल्याची माहिती आहे.

हेही वाचा: Baramati crime News: बारामतीत टग्यांचा बाजार! महाविद्यालयीन तरूणाला लुटलं नंतर काढले नग्न फोटो

त्यानंतर या आरोपींनी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयासमोरील दुकाने व कॉफी शॉपमध्ये घुसून मारामारी करीत तोडफोड केली, तेथील काही वाहनांच्या काचा फोडल्या, या शिवाय एकावर हल्ला केल्यानंतर त्याच्या हाताला कोयत्याची दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर या आरोपींनी दुचाकीवरून हातात कोयते दाखवत बारामती शहर आणि MIDC परिसरात हे युवक फिरत होते.

या घटनेनंतर पोलिसांनी त्वरीत हालचाली करत युवकांना जेरबंद केले असून त्यांनी कुठे कुठे काय नुकसान केलेले आहे याची माहिती पोलिस घेत होते. मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निरपराध नागरिकांना विनाकारण हल्ल्याला सामोरे जावे लागणार असेल तर करायचे काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

टॅग्स :Baramatipolicecrime