"सकाळ'चा राज्यात स्वच्छतेचा गजर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

पुणे - राज्यभरातील अनेक प्रमुख शहरांतील रस्त्यांवर सोमवारी सकाळी स्वच्छतेचा गजर झाला अन्‌ बघता- बघता तो परिसर चकाचकही झाला! त्याचे निमित्त ठरले, ते "सकाळ माध्यम समूहा'च्या स्वच्छता मोहिमेचे. या शहरांतील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मोहिमेत सहभागी झाल्याने ही मोहीम खऱ्या अर्थाने स्वच्छतेचा जागर करणारी ठरली. ही मोहीम तात्पुरती नव्हे, तर कायमस्वरूपी राबविण्याचा निर्धार यानिमित्ताने जमलेल्या तरुणांनी केला. "सकाळ'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) मधील तरुण- तरुणींसह तनिष्का भगिनींनीही या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

पुणे शहर, पिंपरी- चिंचवड आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान संपूर्ण पुणे जिल्ह्यातून 10 टनांच्या आसपास कचरा गोळा करण्यात आला. शहरात जयंतराव टिळक पुलापासून ते ओंकारेश्‍वर पुलापर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान मुठा नदीपात्रातून जवळपास पाच ते सहा कंटेनर इतका कचरा उचलण्यात आला.

दादर चौपाटी झाली चकाचक
मुंबई - "सकाळ'च्या पुढाकाराने आणि जय फाउंडेशन व मुंबई महापालिकेच्या सहकार्याने दादर चौपाटीवर प्लास्टिकविरोधी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत जय फाउंडेशन, "सकाळ'चे तनिष्का व्यासपीठ, परिसरातील रहिवासी, स्वयंसेवी संस्था व महाविद्यालयीन विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

नवी मुंबई, पनवेलमध्ये प्रतिसाद
नवी मुंबई महापालिका व "सकाळ' माध्यम समूहाच्या वतीने बेलापूर सेक्‍टर 8 मधील दुर्गामातानगर परिसरात सकाळी स्वच्छता मोहीम राबवली. पनवेलमध्ये पनवेल महापालिका व "सकाळ' माध्यम समूहाच्या वतीने खांदेश्‍वर उद्यानात मोहीम राबविली.

ठाणे रेल्वेस्थानक परिसरात मोहीम
ठाणे रेल्वेस्थानक सॅटीस परिसरातील टॅक्‍सी स्टॅंडच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. "विश्‍वास'च्या कार्यकर्त्यांसह महापालिकेचे कर्मचारी उपक्रमात सहभागी झाले.

विदर्भात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम
विदर्भात नागपूरसह बहुतांशी सर्वच जिल्ह्यांत "सकाळ'च्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनी ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविले. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा येथे प्रशासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्थांनी जिल्हाभरात स्वच्छता मोहीम राबविली.

"क्‍लीन सिटी, ग्रीन सिटी'ची शपथ
अकोला - गौरक्षण रोड स्थित खंडेलवाल ज्ञानमंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आणि "सकाळ'तर्फे अकोला क्‍लीन सिटी ग्रीन सिटी स्वच्छता अभियान राबविले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात शाळा परिसरात स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.

भवानी मंडप परिसर चकाचक
कोल्हापूर - पर्यावरण रक्षणाचा संदेश देत कोल्हापूर शहरातील अंबाबाई मंदिर व भवानी मंडप परिसरात "सकाळ'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या सदस्यांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये "यिन'च्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हा परिसर चकाचक केला. या मोहिमेत चार पोती ओला कचरा, एक पोते प्लास्टिक व दोन पोती सुका कचरा संकलित करण्यात आला.

नाशिकला कालिकामातेच्या अंगणात मोहीम
नाशिक - "स्वच्छता ही सेवा' या उपक्रमाअंतर्गत ग्रामदैवत कालिकामाता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रविवार कारंजा परिसरातही स्वच्छता करण्यात आली. विशेष म्हणजे स्वच्छता करण्यापूर्वी सर्व सहभागींनी नियमित स्वच्छता करण्याची शपथही घेतली.

जळगावात तरुणाई, महिलांचा सहभाग
जळगाव - स्वच्छता अभियानात "सकाळ'च्या यिन व तनिष्का व्यासपीठातील सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. बसस्थानक, गोलाणी व्यापारी संकुल परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत "यिन' सदस्य सहभागी झाले होते. तर कालिकामाता, दादावाडी परिसरात एकत्रित येऊन "तनिष्का' सदस्यांनी हा परिसर चकाचक केला.

"तुमचे हॅंडग्लोज द्या ना....'
सोलापूर - 'सर, मलाही स्वच्छता करायची आहे. तुमचे हॅंडग्लोज द्या ना....'' शरदचंद्र पवार प्रशालेतील विद्यार्थी थेट मागणी करीत होते, पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांना. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत तांबडे यांनीही हॅंडग्लोज काढून देत, त्यांना स्वच्छतेसाठी प्रोत्साहन दिले. निमित्त होते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजिलेल्या स्वच्छता मोहिमेचे. छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावर मोहीम राबविण्यात आली.

नगरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
नगर - सकाळ सोशल फाउंडेशन व यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे वाडिया पार्क, महात्मा गांधी पुतळा व परिसर, तसेच अहमदनगर एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्थेपुढील रस्त्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. वाडिया पार्क माळीवाडा गेट, फिरोदिया हायस्कूल समोरील रस्ता, महापालिका जुने कार्यालय परिसर, जुना मंगळवार बाजार, सबजेल रोड या परिसरात प्राधान्याने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

Web Title: pune maharashtra news cleaning campaign by sakal