बारावीचा आज ऑनलाइन निकाल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै महिन्यात होणार

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै महिन्यात होणार
पुणे - राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2017 मध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या (ता. 30) दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै महिन्यात होणार आहे. त्यासाठी पाच जूनपासून अर्ज भरण्यास सुरवात होईल.

या वर्षी पंधरा लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी आवश्‍यक अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. गुणपडताळणीसाठी गुणपत्रिकेच्या स्वयंसाक्षांकित प्रतीसह बुधवार (ता. 31) पासून नऊ जूनपर्यंत विहीत शुल्क भरून अर्ज करता येईल. छायाप्रतीसाठी देखील बुधवारपासून 19 जूनपर्यंत अर्ज करता येईल.

उत्तरपत्रिकेचे फेरमूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्‍यक आहे. ती मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून शुल्क भरून विद्यार्थ्यांना विभागीय मंडळांकडे अर्ज करता येतील. फेरपरीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर नंतर जाहीर केले जाणार आहे, असे मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले.

मुलांना धीर द्या!

बारावीचा निकाल उद्या लागत असून, यात अनुत्तीर्ण झाले, तरी विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाणार नाही. कारण जुलै महिन्यात लगेचच फेरपरीक्षा आहे. त्यामुळे अनुत्तीर्ण झाले, तरी विद्यार्थी आणि पालकांनी ताण घेऊ नये. याबाबत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शरद आखेगावकर म्हणाले, 'निकालानंतर खरी भूमिका पालकांनी बजवावी. पाल्य अनुत्तीर्ण झाला, तरी आम्ही तुझ्याबरोबर आहोत, असा धीर त्याला द्यावा. पुन्हा प्रयत्न कर, त्यातून तुला जुलै महिन्यात यश मिळेलच, असा विश्‍वास द्यावा.''

विद्यार्थ्यांनी देखील अपयशामुळे खचून जाऊ नये. निराश होण्याचे कारण नाही. जुलै महिन्यात पुन्हा परीक्षा होणार असल्याने नापास म्हणून शिक्का बसणार नाही. आताचा निकाल आणि सत्य परिस्थिती स्वीकारून पुन्हा अधिक प्रयत्न करा. यश हमखास मिळेल, याची खात्री बाळगावी, असा सल्ला डॉ. आखेगावकर यांनी दिला आहे.

निकालासाठी संकेतस्थळे
www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
http://www.knowyourresult.com
www.rediff.com/exams

Web Title: pune maharashtra news hsc online result