राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

पुणे - कोकण, गोव्यातील बहुतांशी ठिकाणी मंगळवारी पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्या, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते. मात्र, पावसाची नोंद झाली नाही. येत्या शनिवारपर्यंत (ता. 5) कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.

सध्या पावसासाठी पोषक हवामान नसल्याने मराठवाडा आणि विदर्भात पावसाने दडी मारली आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्‍या सरी बरसत आहेत. कोकणातील भिरा, सावंतवाडी येथे पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर मुरूड, माणगाव, माथेरान, वाडा, कर्जत, मंडणगड म्हसाळा, मोखेडा, पनवेल, पेण, येथेही हलका पाऊस पडला. तर डुंगरवाडी, दावडी, शिरगाव, ताम्हिणी, येथेही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील इगतपुरी, लोणावळा, महाबळेश्वर, वेल्हे, गगनबावडा येथे ही हलक्‍या सरी कोसळल्या. विदर्भातही अनेक ठिकाणी वातावरण ढगाळ असून गोंदिया येथे हलक्‍या पावसाची नोंद झाली.

Web Title: pune maharashtra news rain