पाऊस दोन महिन्यांत सरासरी गाठणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

हवामान खात्याकडून दुसऱ्या टप्प्यातील अंदाज जाहीर
पुणे - पुढील दोन महिन्यांमध्ये देशभरात नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) सरासरी गाठेल, असा अंदाज हवामान खात्याने बुधवारी वर्तविली. त्यापैकी ऑगस्टमध्ये 99 टक्के पाऊस पडेल, असेही खात्याने स्पष्ट केले आहे.

हवामान खात्याकडून दुसऱ्या टप्प्यातील अंदाज जाहीर
पुणे - पुढील दोन महिन्यांमध्ये देशभरात नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) सरासरी गाठेल, असा अंदाज हवामान खात्याने बुधवारी वर्तविली. त्यापैकी ऑगस्टमध्ये 99 टक्के पाऊस पडेल, असेही खात्याने स्पष्ट केले आहे.

मॉन्सूनच्या अंदाजाचा दुसरा टप्पा हवामान खात्याने जाहीर केला. त्यात हा अंदाज वर्तविला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये देशाच्या सरासरीच्या शंभर टक्के पाऊस पडले. त्यामुळे यंदा सरासरीइतका पाऊस देशात नोंदला जाईल. त्यात आठ टक्के कमी किंवा जास्त असेल, असेही अंदाजात नमूद केले आहे.

कमी दाबाचा पट्टा सध्या हिमालयाच्या पायथ्याशी आहे. त्यामुळे ईशान्य भारत आणि उत्तर भारतातील राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या परिसरात जास्त दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे राज्यात कोकणात पावसाच्या काही सरी पडत आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर हवामान खात्याने पावसाळ्यातील दुसऱ्या टप्प्याचा हवामान अंदाज जाहीर केला आहे.

देशात पुढील दोन महिन्यांमध्ये सरासरी पाऊस पडेल, असे हवामान खात्याने त्यात स्पष्ट केले आहे. प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याच्या प्रवाहात (एल निनो) कोणताही मोठा बदल झाला नसल्याचेही या पावसाच्या मध्यावधी अंदाजात म्हटले आहे. येथील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान खूप कमी झाले नाही आणि त्यात मोठी वाढही झाल्याची नोंद झालेली नाही. या वर्षीच्या अखेरपर्यंत तसेच पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चपर्यंत ही स्थिती कायम राहण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

काही भागांत पावसाच्या सरी
राज्यातील मॉन्सूनचा खंड कायम असून स्थानिक वातावरणाच्या परिणामामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागांत पावसाच्या काही सरींनी हजेरी लावली. सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, पाषाण, कोथरूड या भागांत सुमारे अर्धा तास पावसाच्या एकामागोमाग एक सरी पडल्या. येत्या गुरुवारी (ता. 10) काही हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Web Title: pune maharashtra news Rainfall will reach average in two months