पुणे-मुंबई रेल्वेसेवा अखेर सुरू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

हजारो प्रवाशांना दिलासा; मुंबई-कोल्हापूर गाड्याही सुरू 

पुणे : मध्य रेल्वेची पुणे ते मुंबई रेल्वे सेवा दोन आठवड्यांनंतर सुरू करण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे रेल्वे रुळाचे नुकसान झाल्याने दोन्ही शहरांदरम्यानची सेवा 4 ऑगस्टपासून बंद होती. रेल्वे प्रशासनाने ही सेवा शुक्रवारी सुरू केली असून शनिवार (ता. 17) पासून पुणे-मुंबई दरम्यानच्या सर्व इंटरसिटी गाड्यांसह या मार्गावरून सुमारे 40 गाड्या त्यांच्या नियोजित वेळेत धावणार आहेत. त्यामुळे दोन आठवड्यांपासून हाल सोसणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 
सततच्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या कर्जत ते लोणावळा घाट भागात दरडी कोसळण्याच्या घटना घडत होत्या. त्यात अनेक ठिकाणी रेल्वेरूळ खराब झाले होते. त्यामुळे रेल्वेने 14 दिवसांपासून पुणे-मुंबई दरम्यानची सेवा बंद ठेवली होती. मात्र, गुरुवारी रुळावरील सर्व अडथळे दूर करून एक माल गाडीची ट्रायल घेतली. तर शुक्रवारी पुणे-मुंबई-पुणे सिंहगड एक्‍स्प्रेस, पुणे-मुंबई इंटरसिटी एक्‍स्प्रेस, पुणे-मुंबई इंद्रायणी एक्‍स्प्रेस आणि मुंबई-पुणे डेक्कन क्वीन गाड्या सोडण्यात आल्या. दरम्यान, पुणे-मुंबई दरम्यानची सर्व वाहतूक शनिवारपासून पूर्वपदावर येणार आहे. या शहरांदरम्यान धावणाऱ्या सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी, डेक्कन एक्‍स्प्रेस व डेक्कन क्वीन या इंटरसिटी गाड्यांसह सुमारे 40 गाड्या त्यांच्या नियोजित वेळेत धावणार आहेत.

तसेच कोल्हापूर येथील पुराचे पाणी ओसरल्याने मुंबई-कोल्हापूर दरम्यानची रेल्वे वाहतूकही पूर्वपदावर आली असून महालक्ष्मी, कोयना, सह्याद्री एक्‍स्प्रेससह अन्य गाड्या सुरू केल्या; तसेच पुणे-मुंबईमार्गे धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्याही सुरू केल्याची माहिती शुक्रवारी रेल्वे प्रशासनाने दिली. 

नोकरीनिमित्त मला पुणे-मुंबईदरम्यान दररोज प्रवास करावा लागतो. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे सेवा बंद असल्याने प्रवाशांचे खूप हाल झाले. मात्र, ही सेवा सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने रेल्वे सेवा बंद न करता रुळाची कामे करावीत. 
- नागेश म्हस्के, प्रवासी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune-Mumbai Railway service finally started