यंदा देशात 98 टक्के पाऊस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

'आयएमडी'चा सुधारित अंदाज; गुरुवारपर्यंत मॉन्सून गोव्यात

'आयएमडी'चा सुधारित अंदाज; गुरुवारपर्यंत मॉन्सून गोव्यात
पुणे - देशात यंदा धुव्वाधार पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मंगळवारी (ता. 6) वर्तविला. देशभरात यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या 98 टक्के पावसाची शक्‍यता व्यक्त करण्यात आली असून, येत्या गुरुवार (ता. 8) पर्यंत गोव्यात मॉन्सून बरसेल, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.

हवामान खात्यातर्फे 18 एप्रिलला हवामानाचा पहिला अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर आता जून ते सप्टेंबर या दरम्यान पडणाऱ्या पावसाचा सुधारित अंदाज हवामान खात्याने मंगळवारी जाहीर केला. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. भारताचा ईशान्य, वायव्येचा भाग, मध्य भारत यंदाच्या पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज यात वर्तविण्यात आला आहे.

मॉन्सून एक दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जाहीर केलेल्या अंदाजात हवामान खात्याने यंदा मॉन्सूनचा सरासरीपेक्षा 98 टक्के पाऊस पडेल, असे म्हटले आहे. जुलैमध्ये सरासरीच्या 96 टक्के तर, ऑगस्टमध्ये 99 टक्के पावसाची शक्‍यता व्यक्त केली आहे. मध्य भारतात जून ते सप्टेंबर दरम्यान शंभर टक्के पाऊस पडेल. वायव्य भारतामध्ये 96 टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. देशात दीर्घकालीन अंदाजाच्या शंभर टक्के पाऊस पडेल.

सुधारित अंदाजाचे निकष
ईशान्य प्रशांत महासागर आणि वायव्य अटलांटिक महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान, विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील हिंदी महासागराच्या पृष्ठभागावरील फेब्रुवारीमधील तापमान, फेब्रुवारी आणि मार्चमधील पूर्व आशियाच्या समुद्रावरील हवेचा दाब, डिसेंबर आणि फेब्रुवारी तसेच, मार्च आणि मे दरम्यान मध्य प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान, उत्तर मध्य प्रशांत महासागरावरील वाऱ्याची दिशा या निकषांवर सुधारित पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Web Title: pune news 98% rain in country