कांदा अनुदान दोन दिवसांत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

पुणे - जिल्हा उपनिबंधकांकडे अद्याप कांदा अनुदानाची रक्कम जमा झाली नाही. येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत या अनुदानाचे पैसे जमा होतील, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. गेल्यावर्षी कांद्याचे भाव पडल्यानंतर प्रतिक्विंटल 100 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. 

पुणे - जिल्हा उपनिबंधकांकडे अद्याप कांदा अनुदानाची रक्कम जमा झाली नाही. येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत या अनुदानाचे पैसे जमा होतील, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. गेल्यावर्षी कांद्याचे भाव पडल्यानंतर प्रतिक्विंटल 100 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. 

गेल्यावर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यांत राज्यातील बाजार समित्यांच्या आवारात विक्री झालेल्या कांद्यावर हे अनुदान देण्यात येईल. पुणे जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये 4 लाख 88 हजार 882 क्विंटल कांदा शेतकऱ्यांनी विकला आहे. सुमारे 7 हजार 928 शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरले असून, त्यांना 4 कोटी 72 लाख 52 हजार 840 रुपये अनुदान मिळणार आहे. या अनुदानाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून, तो निधी पणन संचालनालयाच्या माध्यमातून त्याचे वितरण होणार आहे. पणन संचालनालयाकडून ही रक्कम अद्याप जिल्हा उपनिबंधकांकडे जमा झाली नाही. येत्या दोन दिवसांत हा निधी जमा होईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांनी दिली. 

पणन संचालनालयाकडून हे अनुदान संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा उपनिबंधकांकडे येईल आणि त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर जमा होईल. याबाबत पुणे जिल्ह्याचे उपनिबंधक (ग्रामीण) आनंद कटके म्हणाले, ""यासाठी आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्हा बॅंकेला शेतकऱ्यांचे खाते क्रमांक दिले असून, येत्या दोन दिवसांत हे अनुदान शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत जमा होईल.'' 

राज्यातील दहा लाख शेतकरी पात्र 
* राज्यातील सुमारे 10 लाख 4 हजार 849 शेतकरी या अनुदानासाठी पात्र झाले आहेत. त्यांना 42 कोटी 34 लाख 52 हजार 551 रुपयांच्या अनुदानाचे वाटप केले जाणार आहे. नगर जिल्ह्यातील 45 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून, सुमारे 17 कोटी 99 लाख 9 हजार 909 रुपये इतकी रक्कम आहे, अशी माहिती पणन संचालक डॉ. आनंद जोगदंड यांनी दिली. 

बाजार समितीनिहाय लाभार्थी संख्या आणि अनुदान रक्कम 
पुणे : 2 हजार 847 - 1 कोटी 72 लाख 97 हजार 502 रुपये 
खेड : 108 - 50 लाख 35 हजार 63 रुपये 
जुन्नर : 3 हजार 536 - 2 कोटी 7 लाख 99 हजार 880 रुपये 
बारामती : 22 - 54 हजार 945 रुपये 
इंदापूर : 113 - 14 लाख 67 हजार 287 रुपये 
मंचर : 1 हजार 302 - 71 लाख 29 हजार 663 रुपये 
एकूण : 7 हजार 928 - 4 कोटी 72 लाख 52 हजार 840 रुपये 

Web Title: pune news onion