आष्ट्याचे संजीव माने महाराष्ट्राचे स्मार्ट शेतकरी

आष्ट्याचे संजीव माने महाराष्ट्राचे स्मार्ट शेतकरी

पुणे - सकाळ माध्यम समूहाकडून दिला जाणारा मानाचा 'ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार' यंदा सांगली जिल्ह्यातील आष्टा गावचे संशोधक शेतकरी संजीव माने यांना दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. राज्याच्या ऊस शेतीत शास्त्रज्ञांच्या तोडीचे क्रांतिकारक प्रयोग करणाऱ्या संजीव माने यांनी हजारो सामान्य शेतकऱ्यांपर्यंत ऊस उत्पादकता वाढीचे तंत्र पोचविले आहे. 

पुण्याच्या टिळक स्मारक सभागृहात त्यांना टाळ्यांच्या गजरात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. लोकप्रिय गीते आणि नृत्याच्या रंगतदार मनोरंजन सोहळ्याची मेजवानीदेखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी या वेळी अनुभवली. 

सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, संचालक भाऊसाहेब पाटील, मुख्य संपादक श्रीराम पवार, सकाळचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर महेंद्र पिसाळ, ‘ॲग्रोवन'चे संपादक आदिनाथ चव्हाण, सरव्यवस्थापक प्रमोद राजेभोसले, जैन इरिगेशनचे सिस्टिम लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक रमेश क्षीरसागर, सोनाई कॅटल फीडचे अध्यक्ष किशोर माने, स्मार्टकेम टेक्‍नोलॉजीचे उपाध्यक्ष नरेंद्र देशमुख, सहयोगी उपाध्यक्ष विजयराव पाटील, ओरिएन्टल इन्शुरन्सच्या क्षेत्रिय प्रबंधक 
विनिता जोशी, चौधरी यात्रा कंपनीचे संचालक ब्रिजमोहन चौधरी, यूपीएलचे टेक्‍नोलॉजी हेड डॉ. माधव नाटेकर आदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ‘ॲग्रोवन'चे नवे ऍप आणि वेबसाईटचेदेखील या वेळी अनावरण करण्यात आले.

राज्यातील अकरा प्रयोगशील शेतकऱ्यांना या वेळी ‘ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्ड'ने गौरविण्यात आले. या सोहळ्याला सोनाई कॅटल फीड्‌स, यूपीएल, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., स्मार्टकेम फर्टिलायझर्स लि. बॅंक ऑफ महाराष्ट्र, ओरिएन्टल इन्शुरन्स, चौधरी यात्रा कंपनी प्रा.लि. यांचे प्रायोजकत्व लाभले.
‘ॲग्रोवन’ स्मार्ट शेतकरी पुरस्कारांविषयी अवघ्या महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात उत्सुकता लागून असते. या पुरस्कारासाठी निवड समितीमार्फत राज्य पातळीवरील पाच आणि विभागीय पातळीवरील पाच स्मार्ट शेतकरी निवडण्यात आले.

परीक्षक म्हणून माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, कृषी तज्ज्ञ डॉ. सौ. तरन्नुम कादरभाई आणि सेंद्रिय गटशेतीचे प्रसारक अंकुश पडवळे यांनी काम पाहिले. सांगली जिल्ह्यातील कृषिभूषण शेतकरी श्री. माने यांना एक लाख रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे स्वरूप असलेला ‘ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी' हा सर्वांत मानाचा पुरस्कार घोषित होताच सभागृहात टाळ्यांचा प्रचंड गजर झाला.

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचे तोंड भरून कौतुक केले. निराशा आणि समस्यांच्या वातावरणातही कर्तृत्ववान शेतकऱ्यांना जगासमोर आणणारा ‘ॲग्रोवन’चा उपक्रम स्तुत्य असल्याचे श्री. देशमुख म्हणाले. "शेतकरी हाच आपला पोशिंदा आहे. कर्जमाफी किंवा शेतमाल भाव वाढून मिळत असल्यास शहरवासीयांनी आमच्या समस्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहावे, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, असे भावनिक आवाहन श्री. देशमुख यांनी करताच सभागृह गलबलून गेले.

‘ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी’ पुरस्कार स्वीकारताना सभागृहातून होत असलेला टाळ्यांचा गजर आणि कौतुकाचा वर्षाव पाहून श्री. माने यांचे डोळे भरून आले. ‘प्रयोगशील शेतकरी म्हणून अनेक पुरस्कार मी स्वीकारले, पण आज माझ्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. आनंद गगनात मावेनासा होणे म्हणजे काय असते ते मी आज अनुभवतो आहे. मी ‘ॲग्रोवन’च्या कायम ऋणात राहीन, असे भावपूर्ण उद्गगार श्री. माने यांनी काढले.

विदर्भातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतकरी ज्योती देशमुख यांना ‘ॲग्रोवन प्रेरणा' पुरस्काराचे वितरण होताना सभागृह काही क्षण निःशब्द झाले होते. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सावरण्यासाठी जिद्दीने शेती करीत असलेल्या ज्योतीताईंची यशोगाथा ऐकल्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी अवघ्या सभागृहाने उभे राहून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करत मानवंदना दिली.

शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वर्तमानपत्र काढण्याचा निर्णय अभिजित पवार यांनी घेतल्यानंतर बऱ्याच जणांनी या वृत्तपत्राच्या भवितव्याविषयी शंका व्यक्त केली होती. मात्र शेतकऱ्यांच्या जिज्ञासू वृत्तीवर आमचा विश्वास होता. शेतकरी वाचत नाहीत, हा गैरसमज 'ॲग्रोवन'च्या प्रतिसादामुळे खोटा ठरविला गेला. 'ॲग्रोवन'च्या यशोगाथा वाचून आज हजारो शेतकरी शेती फुलवित आहेत. 'ॲग्रोवन'चे पुरस्कारदेखील इतर शेतकऱ्यांना सतत प्रेरणादायी ठरतील.
- प्रतापराव पवार, 

अध्यक्ष, सकाळ माध्यम समूह 

स्मार्ट शेतकरी पुरस्काराचे मानकरी असे -
ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी - संजीव माने (मु. पो. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली), ॲग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी - विद्या रुद्राक्ष (डिघोळअंबा, अंबाजोगाई, बीड), ॲग्रोवन स्मार्ट सेंद्रिय शेती - प्रभाकर चौधरी (सुभाषनगर, धुळे), ॲग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक - विकास दांगट (पुणे), ॲग्रोवन प्रेरणा पुरस्कार - ज्योती देशमुख (कटयार, अकोला), ॲग्रोवन स्मार्ट कृषिपूरक व्यवसाय - पृथ्वीराज चव्हाण (विठ्ठलवाडी, वाई, सातारा), ॲग्रोवन पश्‍चिम महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी - तानाजी हाके (खर्डी, पंढरपूर, सोलापूर), ॲग्रोवन उत्तर महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी - नाना पाटील (पिंप्रीखुर्द, चाळीसगाव, जळगाव), ॲग्रोवन कोकणचा स्मार्ट शेतकरी - रामचंद्र सावे (चिंचणी, डहाणू, पालघर), ॲग्रोवन मराठवाड्याचा स्मार्ट शेतकरी - रवींद्र देवरवाडे (देवळा, अंबाजोगाई, बीड), ॲग्रोवन विदर्भाचा स्मार्ट शेतकरी - मोहन जगताप (वळती, चिखली, बुलडाणा).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com