राज्यात सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

सर्पदंशावर तातडीने वैद्यकीय उपचार करणे हा एकमेव सुरक्षित मार्ग आहे. दंश झालेल्या ठिकाणी कापड गुंडाळण्यासारख्या पारंपरिक पद्धती वापरू नयेत. उपचारास उशीर झाल्यास संबंधित रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो.
- डॉ. सदानंद राऊत, सर्पदंश उपचार, तज्ज्ञ

पुणे - ‘‘आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याकडील आकडेवारीनुसार देशामध्ये २०१७ मध्ये घडलेल्या सर्पदंशाच्या एकूण घटनांमध्ये सर्वाधिक घटनांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. त्यामुळे सर्पदंशावर उपचार होण्यासाठीच्या सर्व सुविधा सरकारने उपलब्ध करून देण्याची गरज आहे,’’ असे मत सर्पदंश उपचार तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी व्यक्त केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वनस्पती शास्त्र विभाग, बायोस्फिअर्स एनजीओ आणि पुणे वन विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मानव वन्यप्राणी संघर्ष अंतर्गत ‘सर्पदंश आणि त्यावरील उपाय’ या विषयावर ते बोलत होते. जागतिक वन दिन व जल दिनानिमित्त ‘वने व जलपरिसंस्था’बाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भारतीय वनस्पती सर्वेक्षणाच्या पश्‍चिम परिमंडलाच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पी. लक्ष्मीनरासिम्हन यांच्या हस्ते रान-शेवगा व भद्रक या देशी वनस्पतींच्या रोपणाने कार्यक्रमाला सुरवात झाली. पुणे वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) विवेक खांडेकर, वनसंरक्षक (वन्यजीव) आर. के. वानखेडे, उपवनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी, विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. नूतन मालपाठक, प्रा. डॉ. मिलिंद सरदेसाई, शिवाजी फटांगरे, बायोस्फिअर्सचे अध्यक्ष डॉ. सचिन पुणेकर आदी उपस्थित होते. 

तेर पॉलिसी सेंटरतर्फे डॉ. विनिता आपटे व रुचा फडणीस यांनी वृक्ष व पर्यावरण संवर्धन विषयक लघू नाटिका सादर केली. ‘पुणे शहरातील नैसर्गिक वारसा’ या विषयावर हरित दिनदर्शिकेचे व भित्ती प्रकाशचित्रांचे अनावरण करण्यात आले. वन, वन्यप्राणी संवर्धन, संरक्षण आणि व्यवस्थापन या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ४१ क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. महेश शिंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पुणेकर यांनी आभार मानले.

 १ एप्रिल ते ३१ ऑक्‍टोबर २०१७ दरम्यान सर्पदंशाच्या घटना  : २४४३७ 
 शहरी भागात : ५४२५ 
 ग्रामीण भागात : १९०१२ 
 पुण्यात एकूण घटना : १००० 

Web Title: pune news snake bite