स्वाइन फ्लूचे सर्वाधिक मृत्यू पुण्यात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

पुणे - देशात गेल्या सात महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूचे सर्वाधिक मृत्यू पुणे आणि परिसरात झाले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. देशात स्वाइन फ्लूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट झाली असून, त्यातील 50 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे. 

पुणे - देशात गेल्या सात महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूचे सर्वाधिक मृत्यू पुणे आणि परिसरात झाले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. देशात स्वाइन फ्लूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट झाली असून, त्यातील 50 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे. 

देशभरात गेल्या सात महिन्यांमध्ये सुमारे 600 रुग्ण स्वाइन फ्लूमुळे मृत्युमुखी पडले आहेत, त्यांपैकी 330 रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्याच वेळी राज्यातील तीन हजार 101 रुग्णांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. त्यात पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 71 रुग्ण स्वाइन फ्लूने मृत्युमुखी पडले आहेत. पुणे शहरात 29, जिल्ह्यामध्ये 22 आणि पिंपरी- चिंचवडमधील 20 रुग्णांच्या मृत्यूचा त्यात समावेश आहे. 

देशात गेल्या वर्षी एक हजार 786 रुग्णांना स्वाइन फ्लू झाला होता, तर त्यापैकी 265 रुग्णांचा मृत्यू झाला होता. यंदा गेल्या सात महिन्यांमध्ये 12 हजार 460 स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. देशात 2015 मध्ये स्वाइन फ्लूचे 42 हजार 592 रुग्ण होते, त्यापैकी दोन हजार 990 रुग्ण मृत्युमूखी पडले होते, असेही सूत्रांनी सांगितले. 

दोन दिवसांमध्ये औषध द्यावे 
ताप, थंडी, डोकेदुखी, उलट्या अशी स्वाइन फ्लूची ठळक लक्षणे दिसताच पहिल्या दोन दिवसांमध्ये टॅमिफ्ल्यू हे औषध देण्याचे आवाहन आरोग्य खात्यातर्फे डॉक्‍टरांना करण्यात आले. तापाची इतर औषधे देऊनही रुग्णाला बरे वाटत नसल्यास तातडीने स्वाइन फ्लूची औषधे द्यावी, असेही सांगण्यात आले आहे. 

राज्यात स्वाइन फ्लूचे सर्वेक्षण चांगल्या प्रकारे होत आहे. राज्यातील प्रत्येक स्वाइन फ्लूच्या रुग्णाची नोंद होत आहे. त्यामुळे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णांची संख्या जास्त दिसत आहे. स्वाइन फ्लूचे अचूक निदान करण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेबरोबरच पाच सरकारी आणि 18 खासगी अशा 23 प्रयोगशाळांचे जाळे राज्यभरात विणले आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या प्रत्येक रुग्णाच्या मृत्यूची सविस्तर माहिती घेतली जाते. मृत्यू झालेल्यांपैकी 60 टक्के रुग्णांना इतर कोणते ना कोणते गंभीर आजार होते, त्यामुळे उपचारातील गुंतागुंत वाढून मृत्यू झाला. 
- डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, महाराष्ट्र राज्य 

राज्यातील स्वाइन फ्लूचे मृत्यू 
नाशिक ........... 35 
नागपूर ............. 24 
औरंगाबाद ........ 23 
अमरावती ......... 13 
मुंबई ............... 15 

राज्य ........... स्वाइन फ्लूने मृत्यू झालेले रुग्ण 
गुजरात .......... 75 
केरळ ............ 63 
राजस्थान ......... 59 
कर्नाटक ........... 15 
तमिळनाडू .......... 15 
तेलंगण ........... 17 
(स्रोत ः केंद्रीय आरोग्य विभाग) 

Web Title: pune news swine flu