इतिहासाला निरपेक्ष उजाळा हवा - वेंकय्या नायडू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

देगलूरकर यांच्यासारख्या पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासकांच्या योगदानातून देशाच्या इतिहासाला पुन्हा एकदा निरपेक्षपणे उजाळा द्यायला हवा, अशी अपेक्षा उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.

पुणे - ‘‘आपल्या देशाला हजारो वर्षांची परंपरा आहे, इतिहास आहे. भारताने कधीही कोणत्या देशावर आक्रमण केले नाही. दुर्दैवाने आपल्यावर आक्रमण करणाऱ्या आणि सत्ता गाजवणाऱ्यांचा इतिहासात समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, बसवेश्‍वर महाराज, राणी रुद्रम्मा देवी यांसारख्या वीरांच्या इतिहासाबद्दल अधिक माहिती पुढे आणली गेली पाहिजे. देगलूरकर यांच्यासारख्या पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासकांच्या योगदानातून देशाच्या इतिहासाला पुन्हा एकदा निरपेक्षपणे उजाळा द्यायला हवा,’’ अशी अपेक्षा उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.

पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे (त्रिदल) ‘पुण्यभूषण पुरस्कार’ पुरातत्त्वशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांना नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी हुतात्मा मेजर शशिधरन नायर यांच्या मातुश्री लता नायर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मोहम्मद चाँदभाई शेख, सीमेवर लढताना जखमी झालेले नाईक फुलसिंग, हवालदार गोविंद बिरादार यांचाही नायडू यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. डॉ. शां. ब. मुजुमदार, चंदू बोर्डे, डॉ. के. एच. संचेती, डॉ. प्रभा अत्रे आणि फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई या वेळी उपस्थित होते. 

मराठी भाषेत भाषणाला सुरवात करून नायडू म्हणाले, ‘‘पुणे ही महाराष्ट्राचीच नव्हे, तर देशाची सांस्कृतिक राजधानी आहे. या शहरास प्रबोधनाचा वारसा आणि परंपरा मोठी आहे. त्यातूनच देगलूरकरांसारखे विद्वान घडले आहेत. त्यांच्या संशोधनामुळेच समाजाला नवा आयाम मिळतो आणि माहितीही. त्यामुळे इतिहास, पुरातत्त्वशास्त्र आणि ऐतिहासिक वारसा जोपासणे, त्यांचे संवर्धन करणे यासाठी समाजाने प्रोत्साहन द्यायला हवे, त्यासाठी पुण्यभूषण पुरस्कार महत्त्वाचा आहे.’’ 

डॉ. देसाई यांनी प्रास्ताविक केले. प्रभा अत्रे यांनी आभार मानले. योगेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: punyabhushan award