पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा वर्धापनदिन ऑनलाइन! 'या' कारणाने पुरस्कारांची घोषणा लांबणीवर 

तात्या लांडगे
Tuesday, 14 July 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा वर्धापनदिन ऑनलाइन होणार आहे. पालकमंत्र्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण स्वीकारले असून राज्यपाल, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनाही कार्यक्रमपत्रिका पाठविली जाणार आहे. 

सोलापूर : कोरोनामुळे महाविद्यालये व विद्यापीठ बंद ठेवण्यात आले असून, 15 टक्‍के कर्मचाऱ्यांवर कामकाज केले जात आहे. 1 ऑगस्टला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा वर्धापनदिन आहे. मात्र, कोरोनामुळे यंदाचा वर्धापनदिन ऑनलाइन होणार असून, त्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. 

हेही वाचा : शहरात 88 कोरोना पॉझिटिव्ह! तीन मृत्यूमध्ये 20 वर्षीय महिलेचा समावेश; "या' नगरात सापडले कोरोनाचे रुग्ण 

विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू, कुलसचिव आणि परीक्षा नियंत्रक यांच्या उपस्थितीत पालकमंत्री श्री. भरणे विद्यापीठात ध्वजवंदन करतील. त्यानंतर ऑनलाइनद्वारे सिनेट सदस्य, व्यवस्थापन समितीचे सदस्य, प्राचार्य व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. दरम्यान, यंदा जीवनगौरव पुरस्कारासाठी 18, तर उत्कृष्ट शिक्षण संस्थेसाठी एक, आदर्श महाविद्यालय, आदर्श प्राचार्य, आदर्श प्राध्यापक व आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारासाठी प्रत्येकी चार प्रस्ताव विद्यापीठाकडे प्राप्त झाले आहेत. मात्र, लॉकडाउनमुळे बाहेरील विद्यापीठातील तज्ज्ञ उपलब्ध न झाल्याने कोणत्याही पुरस्काराची घोषणा या वेळी होणार नसल्याचेही सांगण्यात आले. 

हेही वाचा : धक्कादायक : कोरोनाची भीती नाही, देवी कोपणार म्हणून म्हणून "या' परिसरात होतेय गर्दी 

पालकमंत्री भरणे यांनी स्वीकारले निमंत्रण 
कुलसचिव डॉ. विकास घुटे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा वर्धापनदिन ऑनलाइन होणार आहे. पालकमंत्र्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण स्वीकारले असून राज्यपाल, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनाही कार्यक्रमपत्रिका पाठविली जाणार आहे. 

पुरस्काराची घोषणा होणार नाही 
उत्कृष्ट शिक्षण संस्था, आदर्श प्राचार्य, आदर्श प्राध्यापक, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी, आदर्श महाविद्यालय आणि जीवनगौरव असे सहा पुरस्कार दरवर्षी वर्धापन दिनाला दिले जातात. तत्पूर्वी, बाहेरील विद्यापीठातील तज्ज्ञांकडून पुरस्कारासाठी प्राप्त अर्जांची छाननी करून त्यातून पुरस्कर्ते निवडले जातात. मात्र, यंदा जिल्हाबंदी आणि कोरोनामुळे बाहेरील विद्यापीठातून तज्ज्ञ येऊ शकले नाहीत. त्यामुळे कोणत्याच पुरस्काराची घोषणा या वेळी केली जाणार नसून, कोव्हिड-19 ची परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर पुरस्कारांची घोषणा आणि वितरण होईल, असे डॉ. घुटे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University anniversary online