राहुल गांधी २४ तर नरेंद्र मोदी ३० एप्रिलला सोलापुरात! कोठे व किती वाजता होणार सभा? आज अर्ज माघार अन्‌ 16पेक्षा जास्त उमेदवार असल्यास वाढणार बॅलेट मशिन

सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात 3617 मतदान केंद्रे आहेत. मागच्या आठवड्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम मशिनचे वाटप करण्यात आले आहे. पण, उमेदवारांची संख्या १६ पेक्षा कमी राहील, या हिशेबाने प्रत्येक केंद्रासाठी एकच ईव्हीएम देण्यात आले आहे.
sakal
sakalsolapur

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघासाठी ३८ उमेदवारांचे ४७ अर्ज आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील ३२ उमेदवारांचे ४३ अर्ज पात्र ठरले आहेत. उद्या (सोमवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. एका मतदारसंघात १६ पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यास प्रत्येक मतदान केंद्रासाठी वाढीव बॅलेट मशिन द्यावी लागणार आहे.

सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात एकूण तीन हजार ६१७ मतदान केंद्रे आहेत. मागच्या आठवड्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील केंद्रांसाठी ईव्हीएम मशिनचे वाटप करण्यात आले आहे. पण, उमेदवारांची संख्या १६ पेक्षा कमी राहील, या हिशेबाने प्रत्येक केंद्रासाठी एकच ईव्हीएम देण्यात आले आहे. एका मशिनवर १६ उमेदवारांचीच नावे बसतात. सध्या सोलापूर मतदारसंघासाठी ३२ तर माढ्यातून ३८ उमेदवार आहेत. प्रमुख राजकीय पक्षांनी अपक्षांची मनधरणी करून त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती देखील केल्याची चर्चा आहे. त्यातील कितीजण माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उमेदवारांचे मतदारसंघनिहाय चित्र स्पष्ट झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक केंद्रासाठी एक बॅलेट युनिट तथा मशिन दिली जाणार आहे. सध्या शासकीय गोदामात चार हजार मशिन शिल्लक आहेत. त्या मशिन आता उमेदवारांची संख्या पाहून वितरित केल्या जातील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

प्रचाराची रणधुमाळी आजपासून; १३ दिवसांत मातब्बर नेत्यांच्या सभा

उमेदवारांच्या अर्ज माघारीनंतर खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. उमेदवारांना २२ एप्रिलच्या दुपारनंतर ५ मेपर्यंत प्रचारासाठी वेळ मिळणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदानाच्या ४८ तास अगोदर प्रचाराच्या तोफा थंडावतात. १३ दिवसांत उमेदवारांना पुन्हा एकदा गावागावात जाऊन आपण काय करणार, आपले मतदारसंघासाठी व्हीजन काय हे पटवून द्यावे लागणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची २४ एप्रिल रोजी सोलापुरातील मरिआई चौकातील एक्झिब्युशन ग्राऊंडवर दुपारी तीन वाजता जाहीर सभा होणार आहे. तर दुसरीकडे ३० एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापूर शहरातील लक्ष्मी- विष्णू मिलजवळील मोकळ्या मैदानावर सभा होणार आहे, अशी माहिती दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा महायुतीच्या उमेदवारांसाठी होतील. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तेलंगणाचे मुख्यमंत्री रवंथ रेड्डी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या देखील सभा होतील.

‘व्हीव्हीपॅट’मधून होईल मतदानाची खात्री

प्रत्येक बॅलेट युनिटला व्हीव्हीपॅट मशिन जोडलेले असते. प्रत्येक मतदाराला आपण केलेले मतदान बरोबर झाले आहे की नाही हे त्यातून पाहता येते. जर आपण केलेले मतदान त्या उमेदवाराला गेलेच नाही असे वाटल्यास त्याला ‘टेस्ट वोट’च्या मागणीचा अधिकार आहेत. त्यासाठी त्या मतदाराने तेथील केंद्राध्यक्षाकडे तक्रार करावी लागते. पण, त्यावेळी संबंधित मतदाराला पुन्हा पुन्हा विचारणा केली जाते, तरीपण त्याने स्वत:चेच खरे असल्याचे सांगितल्यास त्याला सर्वांसमोर चाचणी मतदान करण्याची संधी दिली जाते. त्यावेळी त्याचे मतदान बरोबर झाल्यास अफवा किंवा गैरसमज पसरविल्याबद्दल त्याच्यावर नियमानुसार कारवाई सुद्धा होवू शकते. त्यामुळे प्रत्येकानी आपण केलेले मतदान अचूक असल्याची खात्री करावी व विनाकारण अफवा पसरवू नये. आतापर्यंत देशात कोठेही असा दावा खरा ठरलेला नाही, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com