
देशातील महाविकास आघाडीचे नेतृत्व करतील राहुल गांधी, अमित देशमुखांचा दावा
औरंगाबाद : देशात आघाडीचे वारे वाहत असून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात उत्कृष्ट काम करून देशाला दिशा दाखविली आहे. याच धर्तीवर देशातही महाविकास आघाडीचा प्रयोग होईल व त्याचे नेतृत्व राहुल गांधी करतील, असा दावा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी मंगळवारी (ता.एक) केला. काँग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाचा मराठवाडा विभागाची आढावा मंगळवारी चिकलठाणा एमआयडीसीतील सागर रिसॉर्ट येथे घेण्यात आला. यावेळी श्री.देशमुख बोलत होते. व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, सचिव संपत कुमार, कार्याध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष भाई नगराळे, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष हिश्याम उस्मानी, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार नामदेव पवार, एम. एम. शेख, विशाल मुत्तेमवार, राहुल साळवे, रामकिशन ओझा, प्रकाश मुगदीया, इब्राहीम पठाण, हेमा पाटील, जगन्नाथ काळे, रविंद्र काळे, सय्यद अक्रम यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. (Rahul Gandhi To Be Lead Mahavikas Aghadi In Country, Says Amit Deshmukh In Aurangabad)
हेही वाचा: LPG गॅस महागला, उद्या पेट्रोल-डिझेलही महाग होईल; पण हे कोणाचे अच्छे दिन ?
पुढे श्री. देशमुख म्हणाले, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यात पहिल्यांदा आघाडीचा प्रयोग केला. त्याची परंपरा सुशिलकुमार शिंदे यांनी पुढे चालविली. आता भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) स्थापना झाली. कोविड काळात जगभरात रुग्णांचे हाल झाले. उपचार मिळाले नाहीत, म्हणून बळी गेले. पण आघाडी सरकारने कोरोना अनेक क्षेत्रात केलेले काम देशात दिशादर्शक ठरले. देशातही महाविकास आघाडीचे वारे आहे. या महाविकास आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी करतील, असा दावा श्री. देशमुख यांनी केला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी केले. सूत्रसंचालन किरण पाटील डोणगावकर तर आभार हिश्याम उस्मानी यांनी मानले.
स्वबळावर लढण्यासाठी तयार राहा
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कामाला लागले पाहिजे. डिजिटल सदस्य नोंदणीसाठी केवळ एक महिना शिल्लक आहे. यापुढे कुठल्याही निवडणुकीत तिकीट मिळविण्यासाठी तुम्ही किती सदस्य केले? अशी विचारणा होणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त सदस्य नोंदणी करून महाराष्ट्र देशात एक नंबरवर राहील, याची काळजी घ्या, असे आवाहन देशमुख यांनी केले.
हेही वाचा: Mahashivratri : परळीत प्रभू वैद्यनाथांच्या भेटीला भाविक, दर्शनासाठी गर्दी
कॉंग्रेसमध्ये पहाटे मिळते तिकीट
कॉंग्रेसमध्ये (Congress Party) तिकीट मिळविण्यासाठी खूप कसरत करावी लागते. गेल्या वेळी विधानसभेच्या तिकिटासाठी मुलाखती झाल्या. पण निरोप काही येत नव्हता. मध्यरात्री एक वाजता माझे तिकीट फायनल झाले तर प्रणिती शिंदे यांना दोन वाजता तिकीट अंतिम झाल्याचा निरोप आला, असा किस्सा देशमुख यांनी सांगितले.
औरंगाबाद टॉप फाईव्हमध्ये आणा
डिजिटल सदस्य नोंदणीमुळे तळागाळातील कार्यकर्त्यांची नावे थेट सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यापर्यंत पोचणार आहेत. त्यामुळे जास्तीत-जास्त सदस्य नोंदणी करून औरंगाबाद (Aurangabad) जिल्हा टॉप फाईव्हमध्ये आणा, असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी केले.
एक कोटीचे उद्दिष्ट, एक लाखही नोंदणी नाही
आढावा बैठकीत डिजिटल सदस्य नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. राज्यातून एक कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट असताना आत्तापर्यंत एक लाखाचा आकडा देखील ओलांडता आला नाही. त्यामुळे उर्वरित महिनाभरात चांगले काम करा, असे आवाहन विशाल मुत्तेमवार, भाई नगराळे, रामकिशन ओझा यांनी केले.
Web Title: Rahul Gandhi To Be Lead Mahavikas Aghadi In Country Says Amit Deshmukh In Aurangabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..