
शिवसेना अजूनही 'एनडीए'तच आहे; राहुल शेवाळे यांचा दावा
नवी दिल्ली : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेच्या खासदारांनी देखील बंड पुकारला आहे. आज शिवसेनेचे लोकसभेतील नवे गटनेते राहुल शेवाळे यांनी शिवसेनेच्या १२ खासदारांच्या गटाची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान आम्ही अजूनही एनडीएतच आहोत असे त्यांनी स्पष्ट केलं. (rahul shewale on shivsena leaving nda and bjp alliance maharashtra politics)
राहुल शेवाळे यांनी शिवसेनचा २०१९ लोकसभा निवडणुकीच्या वेळीचा जाहीरनामाच वाचून दाखवला. हा जाहीरनामा उद्धव ठाकरे यांनीच बनवला होता. मात्र दुर्दैवाने महाविकास आघाडी झाली. त्यात कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवण्यात आला. मात्र त्या कॉमन मिनिमम प्रोग्रामध्ये २०१९ च्या जाहिरनाम्याचा कुठेही उल्लेख नव्हता. मात्र एकनाथ शिंदे यांनी जो हिंदुत्वाचा संकल्प केला, त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व १२ खासदार इथं हजर झालो आहोत, असं शेवाळे यांनी म्हटलं.
शेवाळे पुढे म्हणाले की, आम्ही सर्वजण NDA सोबत आहोत, त्यामुळे आमचा पाठींबा एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा असेल, सर्व खासदारांनी उद्धव ठाकरेंकडे विनायक राऊत यांच्याबद्दल नाराजी बोलून दाखवली होती, त्यामुळे लोकसभा गटनेता बदलावा अशी विनंती केली होती, पण ती मान्य झाली नाही म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेत गटनेता बदलण्याचा निर्णय घेतला.
फक्त गटनेता बदललाृ..
शेवाळे यावेळी म्हणाले की, आम्ही कुठलाही पक्ष, गट स्थापन केला नाही, केवळ गटनेता बदलला आहे. आमच्या पक्षाच्या मुख्य प्रतोद भावना गवळी अजूनही आहेत, त्यांना अधिकार आहे, त्यांच्या माध्यमातून हा निर्णय आम्ही घेतला असे शेवाळे म्हणाले.
महत्वाचे म्हणजे, शेवाळे यांनी यावेळी सांगितले की, अरविंद सामंत यांनी जेव्हा राजीनामा दिली तेव्हा कॅबिनेट पदाचा राजीनामा दिला, त्यामुळे एनडीएतून बाहेर पडल्याचं पत्र अजूनही शिवसेनेकडून NDA ला देण्यात आले नाही, त्यामुळे NDA जॉई.न केल्याचं जूनं पत्र त्यांच्याकडे आहे, पण बाहेर पडल्याचं अधिकृत पत्र कधीच देण्यात आलं नाही. यासोबतच यूपीएमध्ये सहभागी झाल्याचं अधिकृत पत्र देखील कधीच देण्यात आलेलं नाही. त्यामुळे आम्ही अजूनही NDA मध्येच आहोत असे राहूल शेवाळे यांनी सांगितलं.