राज्यभरात संततधार...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पुणे-मुंबईसह मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही श्रावण सरी कोसळल्या. 

पुणे : राज्यातील अनेक भागात दडी मारलेल्या पावसाचे श्रावणाच्या सुरवातीलाच पुन्हा आगमन झाले आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून आज (ता. 21) सकाळी 18 हजार 491 क्युसेक विसर्ग केल्याने मुठा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. मध्ये काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पुणे-मुंबईसह मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही श्रावण सरी कोसळल्या. 

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. वीर धरणातूनही पाणी सोडण्यात आल्याने ते खाली कर्नाटक हद्दीत जात आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यात पहाटेपासून संततधार पाऊस सुरू आहे, तर काही जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे गावांचा संपर्क तुटला आहे.

विदर्भातील अमरावतीमध्ये काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. रात्री अमरावतीमध्ये आलेल्या पावसाने नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून आज सकाळपासून अमरावती जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू आहे. तसेच भंडारा जिल्ह्यात चोवीस तास पडणाऱ्या पावसामुळे नाले भरून वाहू लागले आहेत. भंडारा तालुक्यात जवाहरनगर कोढी गावातील 15 घरे पूर्णपणे पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. या 15 कुटुंबांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. 

श्रावण महिन्यातील या पावसामुळे शेतकरीही सुखावला असून, दुबार पेरणीनंतरच्या या पावसाचा शेतकऱ्यांच्या पिकांना अधिकच फायदा होईल. शेतीला हा पाऊस पोषक असला तरी काही भागात अति पावसामुळे पीके संकटात येण्याची शक्यता आहे. पर्यटकांनीही निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी धबधब्यांवर गर्दी केली आहे.

Web Title: rain in all over Maharashtra