साताऱ्यात अतिवृष्टीचे 10 बळी, मातीच्या ढिगाऱ्यांखाली अडकले 31 जीव

साताऱ्यात अतिवृष्टीचे 10 बळी, मातीच्या ढिगाऱ्यांखाली अडकले 31 जीव
ANI

सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात कालपासून मुसळधार पावसाने सुरू केलेल्या मृत्युतांडवात आतापर्यंत 10जणांचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे, तर वेगवेगळ्या दुर्घटनांत ३१ जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः पाटण तालुक्यात पावसाने हाहाकार माजविला असून, तेथे आंबेघर, मिरगाव, हुंबरळी व ढोकावळे येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. यापैकी आंबेघर आणि मिरगाव येथील २४ जण गाडले गेले असावेत, असा प्रशासनाचा अंदाज आहे. वाई तालुक्यात कोंढावळे- देवरुखवाडीतील आठ ते दहा घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. तिथे मायलेकींचा मृत्यू झाला आहे, तर अन्य २७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. जावळी तालुक्यातील रेंगडीत दोघे वाहून गेले असून, दोघे जण बेपत्ता आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील धावरी येथील एकाचा, तर जोर (ता. वाई) येथेही दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोयनेसह जिल्ह्यातील सर्व धरणांतून पाणी सोडण्यात आल्याने नद्यांना महापूर आले आहेत.

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने धोका टाळण्यासाठी कोयनेसह सर्व धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नद्या धोक्याच्या पातळीच्यावर वाहू लागल्या आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून, वाई व पाटण तालुक्यांत मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे.

अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका पाटण तालुक्याला बसला आहे. पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबरळी, ढोकावळे या ठिकाणी भूस्खलन झाले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी झालेली आहे. आंबेघर गावावर डोंगराचा भाग कोसळून चार कुटुंबातील १४ लोक जनावरांसह मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. तर मिरगाव येथे दहा ते १२ लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त होत असून, येथील एकाचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगितले आहे. या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे एक पथक आणि स्थानिक प्रशासन, नागरिकांमार्फत युद्धपातळीवर शोध व बचावकार्य चालू आहे. पावसामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. जावळी तालुक्यातील रेंगडी गावातील दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्या असून, अन्य दोघांचा मृत्यू झाला आहे, तसेच वाई तालुक्यातील कोंढावळे- देवरुखवाडी येथे आठ ते दहा घरे पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्यात दबली गेलेली असून, आतापर्यंत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या ढिगाऱ्यात अडकलेल्या २७ नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. घरात अडकल्याने दोन मायालेकींचा मृत्यू झाला आहे. जोर याठिकाणी दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. महाबळेश्वर तालुक्यामध्ये ५९४.०४ मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. धावरी या ठिकाणी एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणावर घरांचे व शेतीपिकांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. जिल्ह्यात एक अतिरिक्त एनडीआरएफचे पथक आज सायंकाळपर्यंत दाखल होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवस अतिवृष्टी होणार आहे.

-मिरगाव (ता. पाटण) १५०, आंबेघर ५०, ढोकवळे येथील ५० लोक सुरक्षित स्थळी रवाना

- वाझे येथील ५० लोकांना बोटींद्वारे स्थलांतरण

- एनडीआरएफची एक टीम मदतीसाठी मिरगाव येथे पोचली

- एनडीआरएफच्या दोन टीम भुवनेश्वरवरून मागविल्या

- नांदगाव (ता. कऱ्हाड) ५० आणि पाली येथील १५ लोकांचे स्थलांतरण

- महामार्गावरील वाहतूक शिरवळला रोखली

- लिंगमळा रोड खचल्याने वाहतूक बंद

- महाबळेश्वर तापोळा रस्ता खचला

- कळमगावातील मच्छीमार बेपत्ता

- कऱ्हाडातील ५५ कुटुंबांचे स्थलांतरण

- दिवशी घाटात दरड कोसळून दुचाकी स्वाराचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com