कोकणसह मध्य महाराष्ट्रात बरसणार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

उत्तर भारतात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र विरून गेल्यामुळे कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली. पुढील चार ते पाच दिवस पावसामध्ये खंड पडण्याची शक्‍यता आहे.

पुणे -  उत्तर भारतात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र विरून गेल्यामुळे कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली. पुढील चार ते पाच दिवस पावसामध्ये खंड पडण्याची शक्‍यता आहे. मात्र, पुढील दोन दिवस कोकण-गोव्यात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविली आहे. 

उत्तर भारतात हवेचा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यामुळे  दहा दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत होता. मात्र, हे कमी दाबाचे क्षेत्र विरून गेल्यामुळे मागील २४ तासात पावसाचा जोर कमी झाला आहे. बहुतांश शहरात पावसाने उघडीप दिली. जूनच्या अखेरीस सुरवात झालेल्या पावसाने त्या महिन्यातील सरासरी काहीशी भरून काढली. त्यानंतर जुलैच्या सुरवातीचे दोन दिवस सोडले तर दहा दिवस पावसाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांना दिलासा दिला. घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.

मात्र, गुरूवारपासून राज्यात पावसाने उघडीप दिली आहे.अनेक दिवसानंतर स्वच्छ हवामान राहिले. दरम्यान नेहमीप्रमाणे पाठ फिरविणाऱ्या मान्सूने गुरूवारी (ता. ११) मराठवाड्यातील बहुतांश भागात हजेरी लावली. गगनबावडा आणि वेंगुर्ला येथे सर्वाधिक १६० मिमी पावसाची नोंद झाली. चिपळूण, म्हापसा येथे १५०, पणजी आणि त्र्यंबकेश्‍वर येथे १४०, मडगाव, राजापूरमध्ये १३०, महाबळेश्‍वर, दोडामार्ग, फोंडा परिसरात प्रत्येकी १२०, वैभववाडी, श्रीवर्धन, सावंतवाडी येथे ११० मिमी पावसाची नोंद झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainfall in central Maharashtra with Konkan