पावसाचा जोर पुन्हा वाढणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 सप्टेंबर 2016

पुणे - राज्यातील पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल हवामान तयार झाले आहे. उद्यापासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिजोरदार, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

राज्यात गेल्या आठवड्यात सर्वदूर पावसाने दणक्‍यात हजेरी लावली. पाण्याची टंचाई असलेल्या मराठवाड्यासह रब्बीच्या जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस पडला, तर घाटमाथ्यावर झालेल्या पावसाने धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. अनेक नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. मॉन्सूनची अनुपगड, बिकानेर आणि जैसलमेरपर्यंतची सीमा अद्यापही कायम असून, परतीचा प्रवास मंदावल्याने मॉन्सूनचा मुक्काम वाढला आहे.

बंगालच्या उपसागरात ओडिशा, आंध्र प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. गुजरात आणि परिसरावरही 5.8 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे महाराष्ट्र, गुजरातच्या किनाऱ्यासह कोकण, उत्तर महाराष्ट्रात ढगांची दाटी झाली आहे. विदर्भ, आंध्र प्रदेशासह बंगालच्या उपसागरात ढग जमा झाले आहेत. शनिवारपर्यंत कोकणात, शुक्रवारपर्यंत मध्य महाराष्ट्रात अति जोरदार, तर शुक्रवारपर्यंत मराठवाड्यात आणि गुरुवारपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Web Title: The rains grow again