भाजपकडून राज ठाकरे यांची दिलगिरी 

भाजपकडून राज ठाकरे यांची दिलगिरी 

मुंबई - प्रचारसभांच्या माध्यमातून भाजपची चिरफाड करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत भाजपने पहिली दिलगिरी व्यक्‍त केली आहे. राज ठाकरेंनी मुंबईतील सभेत दाखवलेला चिले कुटुंबाचा फोटो भाजपच्या किंवा सरकारच्या अधिकृत जाहिरातीमधला नाही; मात्र अशा पद्धतीने फोटो वापरणे हे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. 

"मोदी है तो मुमकीन है' म्हणणाऱ्या एका योजनेच्या जाहिरातीसाठी भाजपने वापरलेल्या छायाचित्रातील कुटुंबाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी झालेल्या सभेत थेट मंचावर पाचारण केले होते. खोट्या प्रचारासाठी भाजपच्या आयटी सेलच्या लावारीस कारट्यांनी या कुटुंबाच्या घरगुती छायाचित्राचा वापर केला, असा हल्ला राज ठाकरेंनी केला होता. 

"आम्ही कशी गरिबी हटवली याचा प्रचार भाजपने केला. अशा किती कुटुंबीयांचा वापर केला असेल, किती खोटा प्रचार करणार तुम्ही?' असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. 

याला उत्तर देताना विनोद तावडे म्हणाले, की राज ठाकरेंनी सभेत दाखवलेला चिले कुटुंबाचा फोटो भाजपच्या किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीतला नाही. तो फोटो भाजपच्या कोणत्याही अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झालेला नाही. हा फोटो एखाद्या मोदीप्रेमीने समाजमाध्यमांवर टाकलेला असू शकतो; मात्र अशा पद्धतीने फोटो वापरणे हे चुकीचेच आहे. 

"अशाप्रकारे जाहिरातीत फोटो वापरल्याचे आमच्या लक्षात आले, हे चिले कुटुंबातील सदस्यांनी स्वत:हून सांगितले आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी स्वत:हून काही तरी शोधून काढले वगैरे असा आव आणू नये,' असेही विनोद तावडे म्हणाले. 

जाहिरात पेज गायब 
दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेतील पोलखोलनंतर मोदींची जाहिरात असलेले सोशल मीडियावरील पेज गायब झाले आहे. चिले कुटुंबाचा फोटो असलेले "मोदी फॉर न्यू इंडिया' पेज फेसबुकवरून हटवण्यात आले आहे. ही जाहिरात आमची नाही, असा दावा करणाऱ्या भाजपने हे पेज का हटवले, असा सवाल मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com