राज ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 23 एप्रिल 2017

मुंबई - लोकसभेपासून महापालिका निवडणुकांमध्ये पत्करावा लागलेला पराभव, पक्षाला लागलेली गळती, यामुळे मनसेत अस्वस्थता असून, त्याचे पडसाद दोन दिवसांपूर्वी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उमटले होते. मात्र पराभवामुळे खचून न जाता मनसे पुन्हा एकदा जोमाने पक्षबांधणीच्या तयारीला लागणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या काही दिवसांत मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघनिहाय भेटी देणार असून, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मनसे नेते व पदाधिकाऱ्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली.

राजगड कार्यालयात मनसे नेते व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. दोनच दिवसांपूर्वी राज ठाकरे व नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यात राज ठाकरे यांनी नेत्यांची खरडपट्‌टी काढली होती. पदाधिकाऱ्यांनी देखील नेतृत्व योग्य ती भूमिका घेत नसल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीला महत्त्व आले होते. राज ठाकरे पुण्याला गेले असल्याने त्यांच्या अनुपस्थितीतच ही बैठक पार पडली. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासह सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष या बैठकीस उपस्थित होते. राज ठाकरे येत्या काही दिवसांत मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघनिहाय दौरा करून पक्षसंघटना अधिक भक्‍कम करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या भेटीत ते मनसे कार्यकर्त्यांशी संवादही साधणार आहेत. या दौऱ्याच्या आखणीसंदर्भातच आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती नांदगावकर यांनी बैठकीनंतर दिली.

Web Title: raj thackeray communication with member