'अलीबाबा आणि त्याचे ४० जण...' असं म्हणत राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सल्ला | Raj Thackeray Rally | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

Raj Thackeray: 'अलीबाबा आणि त्याचे ४० जण...' असं म्हणत राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सल्ला

Raj Thackeray Gudi Padwa Speech

‘अलीबाबा आणि त्यांचे ४० आमदार’ असा उल्लेख करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना चिमटा काढतानाच राज्यातील सद्यस्थितीची आठवण देखील करून दिली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही बसलेला आहात. उद्धव ठाकरेंच्या मागे जावून सभा घेत बसू नका. महाराष्ट्रात अनेक प्रश्न प्रलंबित आहे. ते विषय हाती घ्या. सभा कसल्या घेत बसला आहात, असं राज ठाकरेंनी CM शिंदेंना सुनावलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला मुंबईतील शिवतीर्थावर मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचं काम, शिवसेनेतील बंड, मशिदीवरील भोंगे अशा विविध विषयांवर भाष्य केले. एकनाथ शिंदेंबाबत राज ठाकरे म्हणाले, 'गेल्या वर्षी जूनमध्ये झालेला तमाशा सर्वांनी पाहिलाय. अलीबाबा आणि त्याचे ४० जण सुरतला गेले. यांना चोर म्हणता येत नाही कारण ते चोर नाहीत. आजवर महाराज सुरतला लूट करून महाराष्ट्रात आल्याचं ऐकलं होतं. पण हे महाराष्ट्रात लूट करुन सुरतला आणि तिथून पुढे गुवाहाटीला गेले'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सल्ला देताना राज ठाकरे म्हणतात, 'उद्धव यांनी वरळीत सभा घेतली. मग शिंदेंनीही तिथे सभा घेतली. खेडमध्येही असेच झाले. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या मागे सभा घेत बसू नये. महाराष्ट्रातील पेंशन योजना, शेतकऱ्यांचे प्रश्न, अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला भाग असे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. त्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले पाहिजे'

'मुंबई आहे की डान्सबार'

सध्या सगळीकडे सुशोभीकरण सुरू आहे. दिव्याच्या खांबावर लाईट लावले आहेत. संध्याकाळी मुंबई बघताना मुंबई आहे की डान्सबार हेच कळत नाही. असं सुशोभीकरण असतं का, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला. विद्यूत रोषणाईची ही काय पद्धत आहे का, सुशोभीकरणाच्या नावाखाली १७०० कोटी रुपये खर्च केले. पण त्याचा उपयोग काय, असंही राज यांनी म्हटलंय.

'महाराष्ट्राचं प्रबोधन करण्याची वेळ आलीये'

एकेकाळी देशाचं प्रबोधन करणाऱ्या महाराष्ट्राचं प्रबोधन करण्याची वेळ आज आलीये अशी खंत व्यक्त करताना राज ठाकरे म्हणतात, आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत. पण आज त्यांचं प्रबोधन करण्याची वेळ आलीये. आत्ता आपण कोणत्या स्वरुपाचं राजकारण बघतोय. नवे उद्योग येत नाहीत, बेरोजगारी वाढत आहे.