राज चौकशीला हजर राहणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

मनसेच्या माझ्या सैनिकांनो, माझ्यावर तुमच्या सर्वांच्या असलेल्या प्रेमाची मला जाणीव आहे. पण, तरीही माझी विनंती आहे की, कुठल्याही पदाधिकाऱ्याने अथवा पक्षाच्या सैनिकाने ‘ईडी’च्या कार्यालयाजवळ येऊ अथवा जमू नये. या विषयावर मला जे बोलायचे आहे ते मी योग्य वेळी बोलेनच.
- राज ठाकरे, मनसेचे प्रमुख

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे २२ ऑगस्ट रोजी सक्तवसुली संचालनालयाच्या (‘ईडी’) कार्यालयात हजर राहणार आहेत. ‘ईडी’च्या नोटिशीला उत्तर देताना मी एकटाच ‘ईडी’ कार्यालयात जाणार असून, कुठल्याही पद्धतीचे शक्तिप्रदर्शन मनसे कार्यकर्त्यांनी करू नये, असे राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

‘‘लोकशाही मार्गाने ‘ईडी’ची नोटीस आली आहे. त्याच लोकशाही मार्गाने मी तिच्या चौकशीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार आणि शक्तिप्रदर्शन करू नये,’’ असा संदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला आहे.

‘मुख्यमंत्र्यांनी सांगितले म्हणून नाही, तर राज ठाकरे यांना राजकीय आकलन जास्त आहे, त्यामुळे राज ठाकरेंनी हा स्वतःहून निर्णय घेतला आहे,’’ असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. काही चूक केली नसेल, तर राज ठाकरे यांना घाबरण्याचे काही कारण नाही. मात्र, कार्यकर्त्यांनी काही धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला, तर कारवाईचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला होता.

कोहिनूर मिल आर्थिक व्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने राज ठाकरेंना २२ ऑगस्ट रोजी चौकशीला बोलावले आहे. या चौकशीला राज ठाकरे उपस्थित राहणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मनसे नेत्यांनी आज बैठक बोलावून २२ ऑगस्ट राेजी ‘ईडी’ कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन करून शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली होती. मात्र, चौकशीसाठी एकटेच जाण्याचा निर्णय राज यांनी घेतला आहे.

सर्वांनी शांतता राखा!
मनसेप्रमुख राज ठाकरे यांना ‘ईडी’ची नोटीस आल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे. राज यांना ईडीची नोटीस आल्यामुळे दोन दिवसांपासून मनसे कार्यकर्त्यांमध्ये घालमेल सुरू झाली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा निषेध करण्यास सुरवात केली आहे. 

कार्यकर्त्यांना आवाहन करताना राज म्हणतात की, मनसेच्या स्थापनेपासून तुमच्या, माझ्यावर अनेक केसेस झाल्या आणि प्रत्येक वेळेस आपण सर्वांनी तपास यंत्रणांचा आणि न्यायालयाच्या नोटिसांचा आदर केला आहे. इतक्‍या वर्षात आता तुम्हाला आणि मला केसेस आणि नोटिसांची सवय झाली आहे; म्हणूनच २२ ऑगस्टला शांतता राखा. सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न होणार, पण तरीही तुम्ही शांत राहा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray Inquiry Politics